Mon, Jun 17, 2019 14:40होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंद्यात ‘सैराट’चा फिवर उतरेना

श्रीगोंद्यात ‘सैराट’चा फिवर उतरेना

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 23 2018 10:46PMश्रीगोंदाः अमोल गव्हाणे 

आजकाल पळून जाऊन विवाह करण्याच लोण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तालुक्यातील एक मुलगा आणि मुलगी पळून गेले. नातेवाईकांच्या मध्यस्थीने या जोडप्याला श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आणले गेले मात्र मुलाच्या घरच्या मंडळीचा या विवाहाला विरोध असल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला  होता. मात्र, मुलीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन चक्क मुलालाच घरी घेऊन गेले. तालुक्यातील  महाविद्यालयीन तरुण- तरुणीचे प्रेमसंबध जुळले. दरम्यानच्या काळात मुलीचा विवाह निश्चित झाला. 24 मार्च विवाहाची तारीख असल्याने या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. हे दोघे पळून गेल्याचे समजताच दोन्ही घरी एकच खळबळ उडाली.

दोन्ही नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली मात्र ते सापडले नाहीत. इकडे या दोघांनी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह उरकून घेतला. दरम्यान, नातेवाईकानी या दोघांचा शोध घेत त्यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आणले. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केल्यानंतर या दोघांनी आम्ही विवाह केल्याचे सांगत आम्ही एकत्रच राहणार असल्याचे सांगितले. मुलाच्या नातेवाईकांनी याला तीव्र विरोध करत आम्हाला हा विवाह मान्य नसल्याचे सांगत पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला.  

दुसरीकडे मात्र मुलीचे नातेवाईक या विवाहावर ठाम होते. स्थानिक पुढारी मंडळीनी यात मध्यस्थी करत मुलामुलीकडे नेमके काय करायचे याबाबत विचारणा केली. या दोघांनी पोलिसांना लेखी देत आम्ही एकत्र राहणार असल्याचे नमूद केले. 

इकडे मुलीच्या नातेवाईकांनी विवाहाची पूर्तता करत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलगा आणि मुलगी विवाहावर ठाम असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी या दोघांचा स्वीकार करत जावयाला मुलीच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.  घरच्या मंडळीचा विरोध झुगारुन हा विवाह होत असतानाच आणखी एका जोडप्याने पळून जावून विवाह केल्याची घटना घडली आहे . दोन दिवसात दोन विवाह पार पडल्याने या विवाहांची तालुक्यात चर्चा सुरू आहे. 

सैराटचे तरुणांकडून अनुकरण

गेल्या वर्षी सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना या चित्रपटाने चांगलीच भूरळ घातली होती. तालुक्यात गेल्या वर्षभरात पळून जावून लग्न करण्याच्या प्रकारामध्ये लक्षणीय वाढ झाली असून अजूनही सैराटचा फिवर उतरायला तयार नाही. वेळीच खबरदारी आवश्यक   पळून जावून लग्न करण्याच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्यात अशा दाखल तक्रारीची आकडेवारी पाहिली तर प्रत्येक पालकाच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही आकडेवारी आहे.