शिर्डी : प्रतिनिधी
साईबाबा समाधी शताब्दीच्या निमीत्ताने साईबाबांच्या प्रचार आणि प्रसारासाठी साईबाबांच्या पादुका देशभरात भ्रमणासाठी पाठविल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी तिव्र विरोध दर्शविल्यानंतर संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार पादुका अखेर भ्रमणासाठी जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत दिली.
साई अतिथी सभागृहात काल शनिवार सायं. 6 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त प्रताप भोसले आदींसह उपस्थित होते.
पादुका भ्रमणाबाबत शिर्डी ग्रामस्थांमध्ये विरोधांची भुमिका घेतली होती. त्यावर साईबाबा संस्थानने संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, बिपीनराव कोल्हे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने काल शुक्रवारी संस्थानच्या विश्वस्त बैठकीत अहवाल सादर करण्यात आला. त्यावर हावरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच साईबाबांच्या खर्या पादुका ह्या दर्शनासाठी ठेवल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या समितीने खोट्या पादुका व खोटे नाणे घेवून देशभर भ्रमण करणार्यांवर कायदेशिर कारवाई करणार असल्याचे सांगितले. इंटरनेटवर साईबाबा संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईटवरही कायद्याचा बडगा संस्थानच्यावतीने उगारला जाणार आहे. असा अहवाल या समितीने विश्वस्त मंडळापुढे दिला होता. याचा संस्थानच्यावतीने स्विकार करण्यात आला आहे.
मात्र या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कदाचित कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ, शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.