Mon, Nov 19, 2018 21:04होमपेज › Ahamadnagar › शिर्डी संस्थानः राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

शिर्डी संस्थानः राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:07AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीवरील सदस्यांच्या नियुक्‍तीचा फेरविचार करण्यात यावा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकारला दिलासा मिळाला.

राज्य सरकारने संस्थानच्या व्यवस्थापन समितीवर केलेल्या 12 सदस्यांपैकी बहुतांशी सदस्य हे सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी संबंधित आहेत, तसेच त्यांच्यापैकी अनेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामुळे अशा व्यक्‍तींच्या व्यवस्थापन समितीवरील निवडीस आव्हान देणार्‍या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या. त्यावर न्यायालयाने निवडीचा फेरविचार करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्या. आर. बानुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.