Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Ahamadnagar › सुटाबुटात जाऊन घरफोड्या!

सुटाबुटात जाऊन घरफोड्या!

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMराहुरी / नगर : प्रतिनिधी

देशभरात दरोडे, चोरी, लुटमार करून धुमाकूळ घालणार्‍या हायप्रोफाईल आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल 14 लाख रूपये किंमतीचे 500 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 750 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे असा 20 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. राहुरी भागातील दोन्ही चोर्‍या केल्याची कबूली आरोपींनी दिली असून, न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना अकरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना उपस्थित होते. राहुरी भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, दरोडे, रस्त्यावरील लुटमार आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हाण उभे असतानाच दि. 7 ऑगस्ट रोजी शहरातील शेटे वसाहतीतील डॉ. प्रविण राधाजी क्षीरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा कपाटातील 39 तोळे सोने लंपास केले होते. त्यापूर्वी दुपारी 12 च्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथील निलेश शेंडगे यांच्या फ्लॅटच्या बंद दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 70 हजाराचे दागिणे लंपास केले होते. 

या घटनांबाबत पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा व श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविली. राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमर यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींनी ह्युंदाई कंपनीची व्हरना ही चारचाकी गाडी गुन्ह्यात वापरल्याची शंका पोलिसांना आली. तशाच प्रकारची व्हरना गाडी एमआयडीसी परिसरातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हवालदार विष्णू घोडेचोर, रविंद्र कर्डीले, सचिन मिरपगार, मनोज गोसावी, राजकुमार मेठेकर, विजय ठोंबरे, योगेश गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवा काळे, संभाजी कोतकर, दिपक शिंदे, रवि सोनटक्के यांनी नगर मनमाड रस्त्यावरील शनि शिंगणापूर फाट्यालगत सापळा रचला. गाडी क्र. यु. पी. 16 ए. के. 3839 येताच पोलिसांनी वाहनावर धाड टाकली. यावेळी गाडीमधील पाच जणांपैकी एकाने पळ काढला.

इरुफान इरशद कुरेशी (वय 38 रा.माजीदपुरा जिल्हा हापुड, उत्तर प्रदेश), इनाम मेहमुद कुरेशी (36 रा.पुराणाबाजार मर्कस मस्जिद, जिल्हा हापुर उत्तर प्रदेश), अस्कीन बसरुदीन मलीक (35 रा.सिकंदराबाद जिल्हा बुलंदशहर उत्तर प्रदेश), इर्शाद अब्दुल रहीम झोजा (45 रा.गोरखी, सिकंदराबाद जिल्हा बुलंदशहर उत्तरप्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नदीम ऊर्फ बल्ली कुरेशी (पुर्ण नाव माहीत नाही) (रा.ता.जि.हापोळ, उत्तर प्रदेश) हा पोलिसांना पाहताच फरार झाला.

नवीन कटावणी, मिनी वजन काटा

गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील बाजूला धारदार चाकू, कटावणी, मोठा स्कू्र ड्रायव्हर आदी दरोड्याचे हत्यार आढळून आले. आरोपींकडील छोट्या आकाराचा इलेक्ट्रॉनिक वजनी काटा 7 मोबाईलही पोलिसांनी जप्‍त केले. आरोपींकडे आढळून आलेली कटावणी ही नवीन प्रकारची असून, कुठल्याही प्रकारचे कुलूप तोडण्यास सक्षम असल्याचे शर्मा यांनी सांगितले. हत्यारे व दागिने लपविण्यासाठी कारमध्ये स्वतंत्र छुपा कप्पा करण्यात आला होता.