Mon, Jul 22, 2019 02:45होमपेज › Ahamadnagar › दाम्पत्याला चौघांनी लुटले

दाम्पत्याला चौघांनी लुटले

Published On: Mar 07 2018 1:16AM | Last Updated: Mar 07 2018 1:11AMसंगमनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील गुंजाळवाडी येथील नातेवाईकांचा कार्यक्रम उरकून संगमनेरकडे येणार्‍या एका मोटारसायकलवरील दाम्पत्याला अज्ञात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जखमी केले व सोन्याची दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 10 हजार 500 रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

संगमनेर खुर्द येथील वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ राहणारे बाळासाहेब खोल्लम हे आपल्या पत्नीसह गुंजाळवाडी येथे सोमवारी गेले होते. तेथील कार्यक्रम उरकून पुन्हा संगमनेरकडे येत असताना राजापूर ते संगमनेर रस्त्यावरील थोरात दूध उद्योग समुहाजवळ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तवेरा गाडी आडवी लावून चौघांनी त्यांना अडविले. यावेळी चोरट्यांनी मोटरसायकलवरील बाळासाहेब खोल्लम यांना चाकूचा धाक दाखवित जखमी केले आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील टॉप्स, दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

याबाबत बाळासाहेब खोल्लम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चार दरोडेखोरांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खोल्लम दाम्पत्याला लुटणारी टोळी पारनेर तालुक्यात असल्याची पोलिसांना खबर मिळताच ढोकी शिवारात पोलिसांनी सापळा लावला. 
यावेळी तिघा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले, तर एक जण पसार होण्यात यशस्वी झाल्याचे समजले.