Fri, Apr 26, 2019 04:09होमपेज › Ahamadnagar › पाण्यासाठी तीन तास रास्तारोको

पाण्यासाठी तीन तास रास्तारोको

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:26PMकर्जत/राशीन : प्रतिनिधी 

कुकडीच्या पाण्यासाठी कर्जत-भिगवन रस्त्यावर चौकीचा निंब येथे शेतकर्‍यांनी भर उन्हात काल (दि.13) तीन तास रस्तारोको आंदोलन केले. पाणी सोडल्याशिवाय आंदोलक मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पोलिसांनी चौदा आंदोलकांना अटक केली.

कुकडीचे पाणी राशीन उपचारीला पूर्ण दाबाने सोडण्यात यावे व नांदणी नदीवरील करमनवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरावा, पाणी अर्ज व पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने कुकडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदवावेत, या मागणीसाठी काल सर्वपक्षीय शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात माजी उपसरपंच शाहूराजे भोसले, शंकर देशमुख, मालोजीराजे भोसले, विक्रम राजेभोसले, डॉ. विलास राऊत, ज्ञानदेव सायकर, शिवसेनेचे जिल्हा उपसमन्वयक बिभीषण गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांना केले लक्ष्य 

कुकडीचे टेल टू हेड असे आवर्तन सोडण्याचे ठरले असताना कर्जत तालुक्यातील राशीन उपचारीला पाणी मिळाले नाही. या चारीवर अवलंबून शेतकर्‍यांवर कायम अन्याय होत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्री असूनही शेतकर्‍यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ना. राम शिंदे यांनी पाणी वाटप समितीच्या सदस्यत्वाचा व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी भाषणामध्ये करून त्यांना लक्ष्य केले. तसचे आघाडी सरकारच्या काळामध्ये या चारीला पाणी येत होते. मग आताच का येत नाही, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

भर उन्हात आंदोलन सुरू होते. तीन तास झाले, तरी आंदोलक पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, असे सांगत होते. कुकडीचे अधिकारी ठोस आश्‍वासन देत नव्हते, तर पालकमंत्री नॉट रिचेबल होते. त्यामुळे आंदोलनाची कोंडी फुटत नव्हती. त्यात कोळवडी येथील उपआभियंता व्ही. के. पाटील यांनी करमनवाडी येथील तलावामध्ये अंतर जास्त असल्याने पाणी देता येणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. त्यामुळे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी चौदा आंदोलकांना अटक केली. त्यांना कर्जत येथे आणून सोडून देण्यात आले.