Mon, Jul 22, 2019 13:13होमपेज › Ahamadnagar › उपमहापौरपदाचा राजीनामा पाठविलेला नाही : खा. गांधी

उपमहापौरपदाचा राजीनामा पाठविलेला नाही : खा. गांधी

Published On: Aug 13 2018 1:17AM | Last Updated: Aug 13 2018 12:03AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदने केलेले विधान आक्षेपार्हच आहे. भाजपाने त्याची दखल घेत त्याला पक्षातून काढून टाकले. त्याचा पक्षाचा राजीनामा आम्ही घेतला. तिथेच आमचा विषय संपला आहे. उपमहापौर पदाचा राजीनामा महापालिकेकडे द्यावा लागतो. तो त्याचा वैयक्‍तिक विषय आहे. आम्ही महापालिकेकडे राजीनामा पाठविलेला नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले आहे. दरम्यान, खासदारांच्या या वक्‍तव्यानंतर छिंदमचे राजीनामा प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत.

भाजपातून बडतर्फ झालेला नगरसेवक श्रीपाद छिंदमने उपमहापौर पदावर असतांना छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीची बदनामी सुरु झाल्यामुळे खा.गांधी यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेवून छिंदमला पक्षातून काढून टाकल्याचे व उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर केले होते. खा. गांधी यांच्या नावे असलेले राजीनामा पत्र दुसर्‍या दिवशी महापौर कार्यालय व आयुक्‍त कार्यालयाकडे सादरही झाले. महापौरांनी हा राजीनामा स्वीकारुन प्रशासनाकडे पाठविल्यानंतर प्रशासनाने उपमहापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविला. निवडणूक होऊन नवीन उपमहापौराची निवडही झाले. मात्र, त्यानंतर मी उपमहापौर पदाचा राजीनामा दिलेलाच नसल्याचा व महापौर, आयुक्‍तांनी षडयंत्र रचून माझा बनावट राजीनामा तयार केल्याचा आरोप छिंदमने केला आहे. तशी तक्रारही छिंदमने तोफखाना पोलिसांत केलेली आहे.

खा.गांधी यांनी रविवारी (दि.12) बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पक्षाने छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा महापालिकेकडे पाठविलेला नसल्याचे स्पष्ट केले. छिंदमने केलेले वक्‍तव्य चुकीचेच आहे. त्याचे कुणीही समर्थन करुच शकत नाही. भाजपानेही याची दखल घेत त्याला पक्षातून काढून टाकलेले आहे. आमच्या दृष्टीने हा विषय तिथेच संपलेला आहे. काही जण या विषयाला वारंवार छेडून राजकीय पोळी भाजत आहेत. काहींच्या या विषयावरुन दुकानदार्‍या सुरु आहेत. छिंदमचा पक्षाचा राजीनामा आम्ही घेतलेला आहे. उपमहापौर पदाचा राजीनामा महापालिकेत द्यावा लागतो. महापालिकेकडे राजीनामा पाठविणे, हा छिंदमचा वैयक्‍तिक विषय आहे. आम्ही त्याचा राजीनामा पाठविलेला नाही, असेही खा.गांधी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, छिंदमने तोफखाना पोलिसांत तक्रार केल्यामुळे उपमहापौर पदाच्या राजीनाम्यावरुन कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. छिंदने महापौर व आयुक्‍तांवर आरोप करुन त्यांना आधीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. त्यावर शिवसेनेच्या वतीने संभाजी कदम यांनी खा.गांधी यांना खुलासा करण्याची मागणी करत खासदारांच्या कार्यालयातूनच राजीनामा महापौर कार्यालयात सादर झालेला होता, असे स्पष्ट केले आहे. आता खा.गांधी यांनी राजीनामा पाठविलेला नसल्याचे व छिंदमचा पक्षाचा राजीनामा घेतलेला असल्याचे स्पष्ट केल्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. महापौर कार्यालयात दाखल झालेला राजीनामा हा खा.गांधी यांच्याच नावे असल्याने तो महापालिकेत पाठविला कुणी? असा सवाल उपस्थित झाला आहे.

‘उड्डाणपूल’प्रकरणी शिवसेनेला केले लक्ष्य!

उड्डाणपुलाचा भूसंपादनासाठी महापालिकेने महासभेत ठराव केला. मात्र, प्रत्यक्षात ठराव वेगळाच लिहिण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनानेच हा खर्च उचलावा. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही करावी, असा ठराव करण्यात आला असल्याचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. यात मनपाच्या आर्थिक अडचणीचा उल्लेख करण्याचे कारण काय? असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भूसंपादनाचा 30 टक्के खर्च मनपाने उचलावा, असे शासन परिपत्रक असल्याने उड्डापुलाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे.