होमपेज › Ahamadnagar › धर्मांत तेढ निर्माण करणारे सरकार

धर्मांत तेढ निर्माण करणारे सरकार

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:42AMशेवगाव : प्रतिनिधी 

जाती-जातीत, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करणारे सध्याचे सरकार आहे. ज्या महापुरुषांचे नाव घेऊन ते सत्तेवर आले, त्यांनाही हे सरकार विसरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरू केले असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शेवगाव येथे काल ( दि.15) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.  यावेळी खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनजंय मुंढे, माजी मंत्री सुनील तटकरे, आ. जयदेव गायकवाड, माजी आ. नरेंद्र घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले, दादाभाऊ कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, अंकुश काकडे, विठ्ठलराव लंघे, पांडुरंग अंभग, सभापती डॉ. क्षितीज घुले आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राष्ट्रवादीने सत्तेच्या काळात शेतकर्‍यांना मदत करण्याचे काम केले. माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्यामुळे ताजनापूर योजनेला निधी दिला. मात्र आज मतदारसंघाची अवस्था आपण पाहात आहात. शेतकर्‍यांना कोणी वाली राहीला नाही. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकर्‍यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. 8 जिल्हा सहकारी बँकांच्या हजार, पाचशेच्या नोटा बदलून दिल्या नाहीत. ते शेतकर्‍यांचे पैसे आहेत. गरिबाला एक व श्रीमंताला दुसरा न्याय दिला जात आहे. शिक्षण, नोकर्‍यांचा बट्याबोळ झाला आहे. महिलांची अब्रू वेशीला टांगली आहे. आम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी काम करीत आहोत.

सरकार गरिबांची मुले अडाणी राहावीत, म्हणून शाळा बंद करीत आहे. मंत्रालयात आत्महत्या होतात. त्यामुळे तेथे जाळी बसविण्याची वेळ सरकारवर आली. अठरापगड जातींना हे सरकार विसरले असून, त्यांना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन पवार यांनी केले.

मुंढे म्हणाले, ज्या भगवानगडाने गल्लीपासून दिल्ली दाखविली, त्या गडाला या शासनाने एक रुपयाही दिला नाही. स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या नावाने ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ सुरू केले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कुठलाही लाभ घ्यायचा असेल, तर ऑनलाईनसाठी रांगेत उभे राहावे लागते. 

या सरकारला ऑफलाईन करण्यासाठी हे आंदोलन असून, जेव्हा हल्लाबोल आंदोलनाचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, तेव्हा हे सरकार सत्तेवर नसेल. वेगवेगळ्या समाज घटकांची फसवणूक करणारे हे फडणवीस सरकार नसून, फसणवीस सरकार आहे. कर्जमाफी झाली नाही. मुस्लिम, मराठा, धनगरांची फसवणूक केली. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष घुले यांनी केले, तर आभार बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी केले.