Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Ahamadnagar › आई-वडिलांच्या मृतदेहासह तिन दिवस घरात कोंडली चिमुकली

आई-वडिलांच्या मृतदेहासह तिन दिवस घरात कोंडली चिमुकली

Published On: Dec 09 2017 11:28AM | Last Updated: Dec 09 2017 11:24AM

बुकमार्क करा

अकोले : प्रतिनिधी

राहत्या घरात बेडरुममध्ये पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील शिवाजीनगर येथे घडली. चित्राप्रकाश बंदावणे ( वय 24) व प्रकाश निवृत्ती बंदावणे (वय 33) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. आश्चर्य म्हणजे त्यांची तिन वर्षांची चिमुकली आई-वडिलांच्या मृतदेहासोबत चक्क तिन दिवस राहीली.

गुरुवारी मयत चित्राचे वडील बाबू रजपूत (रा.वडगाव पान) यांनी मुलीला फोन लावला असता, त्यांची तीन वर्षांची नात फोन उचलून रडत होती. त्यानंतर ते अकोलेला घरी शिवाजीनगर येथे आले असता, घराचा दरवाजा बंद होता. तर घरात नातीचे रडण्याचे आवाज येत असल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. 

पोलिसनिरीक्षक अविनाश शिळीमकर सहा. पो. नि. विकास काळे, उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्ली व पो. हे.कॉ.सागर निपसे यांनी या ठिकाणी जाऊन दरवाजाचे कुलूप तोडले व आत गेले असता हॉलमध्ये लहान तीन वर्षांची मुलगी रडत होती, तर बेडरूममध्ये चित्रा बंदावणे ही मृतावस्थेत पडली होती. तिचे पती प्रकाश निवृत्ती बंदावणे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सरकारी रूग्णालयात नेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. 

काल शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वी घडलेली असून, मृत चित्रा हिचा मृत्यू गळा दाबून झाला आहे. यावरून पत्नी चित्रा हिचा पती  प्रकाश बंदावणे याने गळा दाबून तिचा खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या निष्कर्षापत पोलिस पोहोचले. पो. कॉ. सागर निपसे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पो. नि. अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास काळे हे करत आहेत. 

दरम्यान, या घटनेतील मयत प्रकाश बंदावणे यांची चित्रा ही दुसरी पत्नी आहे. तसेच प्रकाशने घटस्फोटीत असलेल्या चित्राशी दुसरे लग्न केले होते. तिला शिवाजी नगर येथे बंगला भाड्याने घेऊन तो राहत होता.

प्रकाशच्या कुटुंबात मृत्यू परंपरा...

प्रकाशचे वडील व चुलते यांनीही पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तसेच त्याच्या भावाचाही मृत्यू सांदणदरीत घातपातातच झाला असल्याची माहिती समोर आली आहे.