Thu, Jul 18, 2019 00:07होमपेज › Ahamadnagar › उसाला भाव न देणार्‍यांना ठोकण्यासाठी एकत्र या

उसाला भाव न देणार्‍यांना ठोकण्यासाठी एकत्र या

Published On: Dec 10 2017 1:17AM | Last Updated: Dec 09 2017 11:42PM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात  साखर कारखानदारांना उसाला   पहिली उचल 3200 ते 3300  रुपयांनी देण्यास परवडते. मात्र, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस उत्पादकांना  2200  ते  2300 रुपये पहिली उचल देतात. यास येथील साखर साम्राटांचा भ्रष्टाचारच कारणीभूत असल्याची टीका करून, उसाला भाव न देणार्‍या   पांढर्‍या कपड्यातील दरोडेखोरांना ठोकण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले.

एका कार्यक्रमानिमित्त शेट्टी संगमनेरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी लढ्यासंदर्भात विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना शेट्टी यांनी दिलखुलासपणे पण प्रसंगी खोचक उत्तरे दिली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष राजाभाऊ अवसक, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नाशिक जिल्हाध्यक्ष कवी संदीप जगताप, जि. प. सदस्य सीताराम राऊत, सुनील इंगळे, रजत अवसक, अभिजित दिघे  उपस्थित होते.
उसाच्या भावासंदर्भात चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी  जाहीर केले आहे. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, समित्या गठीत करणे हे सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण  आहे. उसाचा भाव जाहीर करण्यासाठी अशा समित्या स्थापण्याची काहीच  गरज नाही आणि बैठक नागपूरला घेण्याची सुद्धा काहीच गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळवली. मात्र, सत्तेवर आल्यानंतर  मोदी सरकार शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमी भाव देऊ शकले नाही. उलट बाहेरील देशातून शेतमाल मागविला. निर्यात बंद केली व भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानातून कांदा बोलविला. असे अनेक शेतकरी विरोधी निर्णय मोदी सरकारने घेतले. त्यामुळे शेतकर्‍यांना ‘बुरे दिन’ आले आहेत.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींच्या वाट्याला जे दुःख आले,  ते दुसर्‍या महिलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी किसान संसदेच्या माध्यमातून  आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा व शेतमालाला हमीभाव, ही दोन विधेयके  मांडणार आहे. त्याचे प्रबोधन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राज्यभर फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीबद्दल बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत.