Mon, Jul 22, 2019 04:57होमपेज › Ahamadnagar › दक्षिण जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

दक्षिण जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:52AMनगर : प्रतिनिधी 

‘भावा आधी पाळणा हाले बहिणीचा अन् मृगा आधी पाऊस पडे रोहिणीचा’ ही जात्यावरची ओवी सार्थ ठरवत रोहिणी नक्षत्राने काल (दि. 1 मे) जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावली. वादळीवार्‍यासह बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी पत्रे उडून गेले, तर कांदा, आंब्याचे नुकसान झाले. पावसाबाबत ठिक-ठिकाणच्या वार्ताहरांकडून मिळालेली माहिती अशी : 

पहिल्याच पावसात जामखेड तुंबले

जामखेड : जामखेड शहर व तालुक्यात शुक्रवारी पहाटे 2 वा. मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली. कांद्याचे मोठे नुकसान झाले. झाडे कोलमडून पडली. शहरात अतिवृष्टी होऊन गटार खोदकाम व मुरूम भरावामुळे पाणी तुंबल्याने अनेकांच्या घरात व दुकानात पाणी घुसले. शहरात सुमारे तासभर अतिवृष्टी झाली. पहाटे सहा वाजेपर्यंत पाऊस चालू होता. जामखेड येथे 83 मिमी., नायगाव 34 मिमी, नान्नज 16 मिमी, अरणगाव 12.2 मिमी., खर्डा 17 मि.मी. पाऊस झाला.

शहरातील संताजीनगर परिसरात झालेल्या बांधकामामुळे व रस्त्यावर केलेल्या मुरूमाचा भरावामुळे एक कि. मी. परिसरात दहा फूट खोल पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले. परिसरातील 60 ते 70 घरांत पाणी शिरले. त्यामुळे या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातील रहिवासी शिक्षक नेते राम निकम, सविता ढगे, प्रिती सुर्वे, संगीता भंडारी, सुभाष तांबे, निखिल भंडारी यांनी सांगितले की, पावसाळ्यात पाण्याचा निचरा रस्त्यावरील भरावामुळे होणार नाही, हे विचारात घेऊन या परिसरातील 70 ते 80 कुटुंबियांनी नगरपरिषदेला एक महिन्यांपूर्वी पत्र दिले होते.

परंतु त्याची दखल नगरपरिषदेने घेतली नाही. तपनेश्वर गल्लीत मुख्य रस्त्याला गटारीचे खोदकाम सहा महिन्यांपूर्वी केले. पण टेंडरच्या घोळात काम अर्धवट राहिले. त्यामुळे जोरदार झालेल्या पावसाने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांत पाणी घुसले. खरेदी-विक्री संघाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळघरातील दुकानांत पाण्याचा लोंढा येऊन नुकसान झाले. मिलिंदनगर परिसरात घरात पाणी घुसले. जिव्हाळा फाऊंडेशन व संताजीनगर येथील रहिवाशांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना निवेदन दिले होते. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे नागरिकांवर तुंबलेल्या पावसाच्या पाण्याचे संकट ओढवले आहे.

गारपिटीसह पावसाची हजेरी

पारनेर : सोसाट्याचा वारा व गारपिटीसह  मान्सूनपूर्व  पावसाने काल (दि. 1) दुपारी पारनेर शहर व परिसरात हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे साठवून ठेवलेला कांदा भिजला. गारांमुळे पाडी लागलेल्या गावराण आंब्यांचे नुकसान झाले. काल दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सोसाट्याच्या वार्‍यास सुरुवात झाली. काही क्षणांत गारांसह पावसाला सुरूवात झाली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाकून ठेवलेला कांदा कागद उडून गेल्याने भिजला. बाजार समितीमध्ये लिलाव सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आलेला कांदा भिजला. व्यापार्‍यांनी कागद टाकून तो झाकण्याचा प्रयत्नही केला. परंतु वार्‍याच्या अफाट वेगापुढे त्यांचे प्रयत्न तोडके पडले.

केवळ 20 मिनिटे चाललेल्या या पावसाने शेतकरी तसेच कांदा व्यापार्‍यांची मात्र चांगलीच दाणादाण उडवली. खेळती हवा रहावी किंवा सुर्यप्रकाश मिळावा, यासाठी कांद्यावर झाकलेला कागद काढून ठेवण्यात आला होता. पावसाची चाहूल लागल्यानंतर शेतकर्‍यांनी कांदा झाकण्याची लगबग केली. परंतु काही वेळातच सोसाट्याचा वारा व गारांसह जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने अनेक ठिकाणी कांदा भिजला. झाडे उन्मळूनही पडली. गावरान आंबा पाडी लागला असून वारा तसेच गारांमुळे आंब्याचेही नुकसान झाले. वास्तविक पारनेर व परिसरातील शेतकरी मान्सूनपूर्व पावसावरच अवलंबून असतात. शुक्रवारी पाऊस सुरू झाल्यानंतर बळाराजा सुखावला. परंतु 20 मिनिटांच्या अवधीनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाचा हिरमोड झाला. हा पाऊस मुबलक झाला असता तर खरीपाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग पहावयास मिळाली असती.

वादळाचा मेहेकरीला तडाखा

करंजी : गुरूवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने जांब, कौडगाव, पिंपळगाव लांडगा, मेहेकरी या गावांना मोठा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. कांदा मोठ्या प्रमाणात भिजला. डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. पावसासह आलेल्या वादळामुळे जांब येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाजी पवार यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. दत्ता पवार, एकनाथ पवार, अण्णासाहेब पवार, चांगदेव कोहक, प्रभाकर पवार, रावसाहेब पवार यांचा कांदा भिजला. डाळिंबागेतील झाडे उन्मळून पडली. मका, कडवळ भुईसपाट झाले.  पहिल्याच पावसाने शेतकर्‍यांची मोठी दाणादान उडवून दिली आहे. शुक्रवारी सकाळी मंडलाधिकारी पवार, तलाठी शिंदे यांनी नुकसानीचे पंचनामे केले.

पावसाने नेवाशात गारवा

नेवासा :  नेवासा शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी सायंकाळी हजेरी लावल्याने वातावरणात गारवा होण्यास मदत झाली. जोरदार वारा असल्याने नागरिकांची, शेतकर्‍यांची धावपळ झाली. वार्‍यासह पावसाला सुरूवात झाल्याने शेतामधील कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली होती. छप्परामधील, चाळीतील कांदा भिजतो की काय? या धास्तीने शेतकरी चिंतेत होता. शहरासह नेवासा फाटा, खडका, मुकिंदपूर, हंडीनिमगाव, नेवासा बुद्रूक, मडकी, खलालपिंप्री भागातही सुमारे अर्धा तास वादळासह मध्यम पाऊस झाला. थोड्या पावसानेदेखील शहरात दलदल झाली होती. गटारीचे काम चालू असल्याने दलदल वाढली आहे. वीजपुरवठा उशिरापर्यंत खंडीत होता. विजांचा कडकडाटासह रात्रीपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. जोरदार वार्‍याने काही भागात झाडांच्या फांद्या तुटल्या. काही भागात पाटाला पाणी व पाऊस दोन्ही होते. बालगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. 

शेवगावात तासभर पाऊस

शेवगाव शहरासह काही भागात वादळी वार्‍यासह सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. शहरात काही वेळ गारा पडल्या. 1 जून रोजी दिवसभर वातावरण तप्त होत राहिले आणि सायंकाळी 6 च्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होऊन वादळ सुरु झाले. काही वेळेतच विजेच्या आणि ढगांच्या कडकडासह वादळी पाऊस सुरु झाला. शेवगाव शहरासह जोहरापूर, भगूर, वरुर, अमरापूर आदी भागात जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी साचले होते. शेवगाव शहरात काही वेळ गारांचा पाऊस झाला. वादळाने विजपुरवठा खंडीत झाला. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागती होणार असून हवामानात काहीसा गारवा निर्माण होणार आहे. तालुक्याचा बहुतांशी भाग अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहे.