Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › सिव्हिल हडकोतील बर्थ डे पार्टीवर छापा

सिव्हिल हडकोतील बर्थ डे पार्टीवर छापा

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 19 2018 12:16AMनगर : प्रतिनिधी

सिव्हिल हडको परिसरात चालणार्‍या एक अनधिकृत बर्थ डे पार्टीवर तोफखाना पोलिसांनी गुरुवारी (दि. 17) रात्री छापा टाकला. त्यात चार जणांना अटक करण्यात आली, असून इतर पसार झाले. पोलिसांनी तेथून जुगाराचे साहित्य, डीजे सिस्टिम, 18 मोटारसायकली असा सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

अटक केलेल्यांमध्ये अनिकेत पोपट साळवे (वय 18, रा. प्रेमदान हडको), दीपक विनायक म्हस्के (वय 21, रा. गुलमोहोर रस्ता), देवांग संजय भुजबळ (वय 19, रा. गुलमोहोर रस्ता), सागर बाळू गायकवाड (वय 22, रा. सिव्हिल हडको) यांचा समावेश आहे. कपिल पगारे, सनी पगारे हे दोघे फरार असून, त्यांच्यासह पार्टीत सहभागी झालेल्या इतरांचा शोध सुरू आहे.

सिव्हिल हडको परिसरातील पंचम कॅफे येथे पगारे बंधूंनी एक अनधिकृत बर्थ डे पार्टी बोलाविली आहे. या पार्टीत सेलिब्रेशन करणारे डीजे सिस्टिमवर रस्त्याच्या कडेला वेड्यावाकड्या अवस्थेत नाचत असून, सार्वजनिक शांततेचा भंग करीत आहेत. तसेच जुगारही खेळत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, विशाल सणस, सहाय्यक फौजदार गर्गे, अडागळे आदींसह पोलिस पथक तातडीने तेथे जाऊन छापा टाकला. पोलिस आल्याचे दिसताच पार्टीत सहभागी झालेले दिसेल, त्या रस्त्याने पळून जाऊ लागले. पार्टी सुरू असलेल्या शेजारच्या खोलीत काही जण जुगार खेळत होते. चार जण पोलिसांच्या हाती लागले, तर कपिल पगारे व सनी पगारेसह इतर आरोपी पसार झाले. 

पोलिसांनी डीजे सिस्टिम, 18 मोटारसायकली, जुगाराचे साहित्य असा एकूण एकूण 8 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.