Thu, Apr 25, 2019 14:12होमपेज › Ahamadnagar › ताडीवर पोलिस, जिल्हाधिकार्‍यांचे छापे

ताडीवर पोलिस, जिल्हाधिकार्‍यांचे छापे

Published On: Dec 27 2017 9:44PM | Last Updated: Dec 27 2017 9:44PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

बेकायदा ताडीची विक्री विरोधात पोलिसांनी छापासत्र सुरू केले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन हेही कारवाईत सहभागी झाले होते. काल (दि. 27) सायंकाळी एकूण 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता उघड झाली आहे. 

या कारवाईत उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर हेही सहभागी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेला कोंड्यामामा चौकात पवन भिंगारे याच्या घरात ताडीची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना समजली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले आदींच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून बाळासाहेब काळे याला ताब्यात घेतले व भिंगारे हा पसार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे, विशाल सणस यांच्याही पथकाने कारवाईचे सत्र सुरू केले. कोंड्यामामा चौकात दोन, तोफखाना परिसर व सर्जेपुरा चौकात प्रत्येक एक अशा 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांनीही काही ताडी विक्रेत्यांच्या अड्ड्यावर भेटी दिल्या. 

पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन हेही उत्पादन शुल्क अधीक्षकांसमवेत कारवाईत सहभाग घेतला. शहरातील अवैध ताडी विक्रेत्यांविरुद्ध पोलिस व जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता उघड झाली आहे.

विषारी ताडीची निर्मिती?
छाप्यात पकडलेली ताडी ही रसायनमिश्रितच नव्हे, तर कृत्रिम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ताडीत मिश्रण केला जाणारा ‘क्‍लोरेल हायड्रेड’ हा पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक आहे. त्याने मानवी जिवितास धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या ताडीतून विषारी दारुकांडासारखी दुर्दैवी प्रकार घडू शकतो. तरीही उत्पादन शुल्क विभाग सुस्तावलेला असल्याचे पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकारातून केलेल्या कारवाईतून उघड झाले.