Thu, Aug 22, 2019 10:19होमपेज › Ahamadnagar › राहुरीत आरपीआयचा रास्तारोको

राहुरीत आरपीआयचा रास्तारोको

Published On: Dec 22 2017 1:24AM | Last Updated: Dec 21 2017 10:51PM

बुकमार्क करा

राहुरी : प्रतिनिधी 

खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणाची फेरसुनावणी व्हावी, फितूर साक्षीदारांची सीबीआयमार्फत चौकशी करून त्यांना खटल्यात सहआरोपी करावे आदी मागण्यांसाठी राहुरी येथील बसस्थानकासमोर आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जोपर्यंत आगेप्रकरणातील आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आंदोलने केले जातील, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.

खर्डा (जामखेड) येथे नितीन आगे खूनप्रकरणाच्या खटल्यात साक्षीदार फितूर झाल्याने सबळ पुरावे असूनही सर्व 9 आरोपी निर्दोष सुटले. याप्रकरणावरून देशातील न्यायव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेला काही धनदांडग्यांकडून खिंडार पाडले जात असल्याची टीका आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी केली. 

एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे, विलास साळवे, सुभाष त्रिभुवन, अशोक गायकवाड, संजय कांबळे, किरण दाभाडे, सुनील जाधव, किशोर ठोकळ, सुनील शिरसाठ, अनिल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोणत्याही परिस्थितीत नितीन आगे खूनप्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नसल्याचे सांगितले. 

  आंदोलनावेळी शेकडो आंदोलकांनी राहुरी बसस्थानकासमोरील नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.   उपस्थितांनी नितीन आगे खून खटल्यातील फितूर झालेले सरकारी साक्षीदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आगे खून खटला प्रकरणाची फेर सुनावणी व्हावी, सरकारी साक्षीदार असलेल्या नोकरदारांना नोकरीतून तात्काळ बडतर्फ करावे,तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजासाठी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, आदी मागण्या करून संताप व्यक्त केला.

 आंदोलकांनी तब्बल दीड तास रास्तारोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरीस तहसीलदार अनिल दौंडे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. 

  दरम्यान, या रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाल्यानंतर पोलिस प्रशासनासह काही नागरिकांनी   पुढाकार घेत वाहनांना मोकळी वाट करून दिली. त्यामुळे दीड तासापासून खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.