Tue, Aug 20, 2019 04:33होमपेज › Ahamadnagar › महसूलच्या कारवाईचा धसका

महसूलच्या कारवाईचा धसका

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:17PM

बुकमार्क करा

राहुरी ः प्रतिनिधी 

मुळा व प्रवरा नदीपात्रांमध्ये वाढलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूलने गेल्या आठवडाभरापासून पुढाकार घेतला आहे. तहसीलदारांनी मुळा नदीपात्रात छापे टाकून टेम्पो, ट्रॅक्टर, केनीसह कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने वाळूतस्करांनी महसूलच्या कारवाईचा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासन कारवाई करीत असताना पोलिस मात्र सुस्तावल्याचे चित्र आहे.
राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. राजरोसपणे 150 ते 200 वाहने मुळा नदीपात्रातून वाळूउपसा करीत असल्याची चर्चा आहे. प्रवरा पात्रातही वाळूतस्करांनी वाळूची लूट करण्याचे थांबविले नाही. परिणामी, राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी गत आठवडाभरात शेरी चिखलठाण, बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, देसवंडी, आरडगाव, मानोरी आदी भागांत छापे टाकून वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला.  

बारागाव नांदूर भागातून 3 ट्रॅक्टर, 2 टेम्पो यांसह 3 वाळू उपशासाठी वापरल्या जाणार्‍या केनी महसूलने ताब्यात घेत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. चिखलठाण भागातूनही डंपर, ट्रक, ट्रॅक्टर ताब्यात घेत वाळूतस्करांवर कारवाई करण्यात आली. महसूल प्रशासन कारवाईत पुढाकार घेत असताना पोलिस  मात्र वाळूतस्करांच्या उद्रेकाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. वाळू तस्करांमुळेच राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली असतानाही पोलिस वाळूतस्करांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे वाळूतस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 
दरम्यान, वाळूतस्करांच्या वाढत्या उद्रेकामुळे राहुरीची शांतता भंग पावत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.