होमपेज › Ahamadnagar › कोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव

कोरेगाव घटनेमुळे उत्तर जिल्ह्यात तणाव

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 10:48PM

बुकमार्क करा
राहाता : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील घटनेचे राहात्यात तीव्र पडसाद उमटले.  भीमसैनिकांनी सुमारे दोन ते अडीच तास नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. राहाता शहरातील बाजारपेठ काल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, राहाता बसस्थानकावर चार बसेसवर दगडफेक झाली असून यामध्ये बसच्या काचा फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी राहाता पोलिसात अज्ञात 10 ते 12 इसमांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी राहाता शहरात सकाळी छत्रपती शिवाजी चौकात जमून पोलिस स्टेशनला मोर्चा नेला व पो. नि. बाळकृष्ण कदम यांना निवेदन दिले. त्यानंतर जमावाने नगर-मनमाड महामार्गालगतची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. यावेळी संतप्त जमावाने नगर-मनमाड महामार्गावर शिवाजी चौकात येऊन रास्तारोको आंदोलन सुरू केले.
आंदोलनप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायकराव निकाळे, युवा नेते प्रदीप बनसोडे, नगरसेवक भीमराज निकाळे, साकुरीचे उपसरपंच सचिन बनसोडे, सिमोन जगताप, कॉम्रेड राजेंद्र बावके, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, नगरसेवक अ‍ॅड. विजय बोरकर, नगरसेवक सलीम शहा, पत्रकार राजेंद्र भुजबळ, रमेश गायकवाड, बापूसाहेब वैद्य, अनुप कदम, बौद्ध महासभेच्या महिला आघाडीच्या नैनाताई शिरसाठ आदींनी  भीमा-कोरेगाव घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.तहसीलदार माणिकराव आहेर व पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना भीमसैनिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. 
दरम्यान, दुपारी राहाता बस स्थानकावर पुणे-शहादा, मनमाड-पुणे, शिर्डी-संगमनेर व शनि शिंगणापूर-कोपरगाव या राज्य महामार्ग परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाली असून या दगडफेकीमध्ये बसेसच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. सुनीता दत्तात्रय काळे व शैलजा रत्नाकर रासने या दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या आहेत. रासने या नगर येथून शिर्डी येथे साईदर्शनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहाता बसस्थानकातील बसेसवर दगडफेक झाल्याप्रकरणी कोपरगाव बस आगारातील चालक भिमराव धनसिंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात 10 ते 12 इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राहाता शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. शिर्डी उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सागर पाटील हे राहात्यात बराच वेळ तळ ठोकून होते. त्याचबरोबर समाजाचे नेते विनायक निकाळे, धनंजय निकाळे, रावसाहेब बनसोडे,  प्रदिप बनसोडे, नितीन शेजवळ, गणेश निकाळे, भारतीय बौध्द महासभेचे गौतम पगारे, रमेश गायकवाड, राजेंद्र पाळंदे, नाना त्रिभुवन आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी अतिशय संयमाने वातावरण हातळले.