होमपेज › Ahamadnagar › राहाता पालिकेच्या त्या कर्मचार्‍यांचे निलंबन

राहाता पालिकेच्या त्या कर्मचार्‍यांचे निलंबन

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 13 2018 11:43PMराहाता : प्रतिनिधी

घंटागाडीत कचर्‍यासोबत मनोरुग्णास वाहून नेल्याप्रकरणी मुख्याधिकारी बी. सी. गावित यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाचे वाहनचालक व प्रभारी विभागप्रमुख यांच्यावर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली. तसेच याप्रकरणी चौकशीअंती कठोर कारवाईचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर काल स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राहाता नगरपालिकेसमोरील ठिय्या आंदोलन मागे घेतले. राहाता नगरपालिकेच्या घंटागाडीत कचर्‍यासोबत मनोरुग्णास कचरा डेपोत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

सदरची घटना स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या योगेश मालखरे यांना समजल्यानंतर त्यांनी राहात्यात येऊन येथील मनोरुग्णांना तुपे व वाबळे यांच्या मदतीने ताब्यात घेत सदरच्या घटनेच्या निषेधार्थ दोषी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी दुपारनंतर राहाता नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.  या आंदोलनामध्ये योगेश मालखरे यांच्यासह गणेश लावरे, भारती कांबळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

काल मुख्याधिकारी बारिंद्रकुमार गावित यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्याप्रसंगी तेथे पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, गटनेते विजय बोरकर, नगरसेवक साहेबराव निधाने, नगरसेवक सलीम शहा, नगरसेवक सागर लुटे, नगरसेवक सचिन गाडेकर, नगरसेवक भीमराज निकाळे, प्रजा सुराज्य पक्षाचे बाळासाहेब गिधाड, सुहासराव वाबळे उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी गावित  म्हणाले की, सदर मनोरुग्णा बाबत घडलेला प्रकार  धक्कादायक होता.

कर्मचार्‍यांकडून अनावधानाने चूक घडून आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. या प्रकरणी कर्मचारी अशोक साठे व तात्पुरता वाहन चालक असलेला सफाई कामगार सुनील मोकळ यांना एक दिवसासाठी निलंबित केल्याचे सांगून, या प्रकरणी मंगळवार दि. 12 रोजी पाच कर्मचार्‍यांना लेखी नोटिसा देण्यात आल्या आहेत.  ॉत्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सविस्तर चौकशी अंती दोषी कर्मचार्‍यांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हे प्रकरण सादर करणार आहे. त्यावर झालेला कारवाईचा अहवाल दिला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.