Thu, Jun 27, 2019 10:26होमपेज › Ahamadnagar › निळवंडेचा पाणीप्रश्‍न शिवसेनेमुळेच मार्गी

निळवंडेचा पाणीप्रश्‍न शिवसेनेमुळेच मार्गी

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:29PMराहुरी : प्रतिनिधी 

निळवंडे धरणाच्या प्रश्‍नावर निवडून आलेल्या बड्या  नेत्यांनी लाभार्थ्यांना झुलवत ठेवण्याचे कार्य केले. शेतकर्‍यांचे पाणी प्रश्‍न सोडविण्याची धमक शिवसेनेमध्येच असल्याचे दाखवून दिले आहे. निळवंडेचा प्रश्‍न आमच्या पाठपुराव्यानेच मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. 

राहुरी तालुक्यातील कणगर येथील निळवंडे धरणाच्या पाण्याबाबत आयोजित शेतकरी परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे होते. व्यासपीठावर रावसाहेब खेवरे, निळवंडे पाणी परिषदेचे सुहास उर्‍हे, दादासाहेब पवार, जि. प. सदस्य गोविंद मोकाटे, भास्कर गाडे, हरिभाऊ शेळके आदींची उपस्थिती होती. ना. शिवतारे यांनी जिल्ह्यातील काँगे्रस, राष्ट्रवादीसह भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींवर शरसंधान साधत निळवंडेबाबत लोकांना झुलवत ठेवून निवडणुका जिंकणार्‍यांना शेतकरी जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले. निळवंडे धरणाला निधी प्राप्‍त करून देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. त्यात यश मिळत असून साधारण दीड ते दोन वर्षांतच निळवंडेच्या लाभधारकांना पाणी उपलब्ध होऊन जिरायत भागाचे नंदनवन होणार असल्याचे सांगत ना. शिवतारे यांनी राज्यात शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली असून त्यांना सुखी करण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल, असे सांगितले. 

ना. शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात विमानतळ, शेती सिंचनाबाबत ठिबकद्वारे शेतीला पाणी देण्याचे कार्य राज्यात प्रथम करून शेतकर्‍यांसह युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगत निळवंडेबाबत आजोबांनी सुरू केलेले काम नातवाच्या काळातही पूर्ण होत नसल्याचे सांगत मंत्री शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली. 

खेवरे यांनी राहुरी तालुक्याला लाभलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधी एकही प्रकल्प न आणता केवळ भाषणबाजीने लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करीत आहे. शासकीय अधिकार्‍यांवर दबंगगिरी करून नको ती उठाठेव आ. कर्डिलेंची तालुक्यात सुरू आहे. मुळा धरणाचे पाणी दरवाज्याखाली जात असतानाही केवळ श्रेय मिळावे, म्हणून कळ दाबून पाणी सोडलेले आ. कर्डिले यांना लोकांनी चांगलेच  ओळखले आहे. शिवसेनेने वीजप्रश्‍न, कर्जमाफी आदींबाबत सर्वांधिक आंदोलने हाती घेत शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रा. गाडे यांनी आ. कर्डिले यांच्या दबंगिरीला न घाबरता सर्वांनी एकजूट करावी. सर्वसामान्यांसह शासकीय अधिकार्‍यांना वेठीस धरून स्वतःची टिमकी वाजविण्यात माहीर असणार्‍या आ. कर्डिले यांनी सुजलाम सुफलाम असलेल्या राहुरी तालुक्यासह नगर-पाथर्डी भागाला देशोधडीस लावण्याचे कार्य केले असल्याची टीका केली. 

सेनेच सुहास उर्‍हे, दादासाहेब पवार, जि.प.सदस्य गोविंद मोकाटे आदींनी मनोगत व्यक्‍त करून काहींनी शकुनीमामा होऊन निळवंडे बाबत दिशाभूल केल्याची टीका साधली. सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केले. शेतकरी परिषदेसाठी दत्तू वरघुडे,नवनाथ गाडे, विठ्ठल नालकर, अक्षय घाडगे, किशोर घाडगे,अप्पा आरगळे,रघू गाडे, सुयोग गाडे. संजय कदम,विजय उर्‍हे, तसेच शेतकरी उपस्थित होते.