Mon, May 27, 2019 08:46होमपेज › Ahamadnagar › 'पुरुषोत्तम' यंदासुद्धा 'अहमदनगर'करांचाच

'पुरुषोत्तम' यंदासुद्धा 'अहमदनगर'करांचाच

Published On: Sep 03 2018 1:41PM | Last Updated: Sep 03 2018 1:41PMपुणे : प्रतिनिधी

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत यंदा देखील अहमदनगरच्या संघाने बाजी मारली असून प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या 'पी. सी. ओ.' एकांकिकेने प्रथम क्रमांक प्राप्त करून यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले आहे. तसेच, सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या 'बातमी क्रमांक एक करोड एक' आणि मराठवाडामित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या 'अफसाना' एकांकिके'ने व्दितीय-तृतीय क्रमांक प्राप्त करून हरी विनायक करंडक, संजीव करंडक प्राप्त केला. तर, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे जयराम हर्डीकर पारितोषिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'विपाशा' एकांकिकेने प्राप्त केले आहे.

तसेच, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक (अनंत नारायण स्मृतिचिन्ह) शुभम गिजे, गंधर्व गुळवेलकर (दोनपंथी) यांनी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक (नटश्रेष्ठ गणपतराव बोडसे स्मृतिचिन्ह) विनोद गरुड (पी. सी. ओ.), सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य (नटवर्य केशवराव दाते स्मृतिचिन्ह आणि स. द. आपटे पारितोषिक) मोनिका बनकर (पी.सी.ओ., भूमिका राधा) हिने, अभिनय नैपुण्य पारितोषिक हेमंत शिर्के (अभिनेता, अफसाना) याने, अभिनय नैपुण्य पारितोषिक अनघा काकडे (अभिनेत्री, रसिक) हिने, वाचिक अभिनय नैपुण्य पारितोषिक ऐश्वर्या फडके (विपाशा) यांनी प्राप्त केले. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून शरद पोंक्षे, केशव साठे आणि माधव अभ्यंकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पार पडणार आहे. शुक्रवारी भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.