होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ छावणीचालकांना अखेर दणका

‘त्या’ छावणीचालकांना अखेर दणका

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

न्यायालयाच्या आदेशानुसार अनियमितता आढळून आलेल्या चारा छावण्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हाभरात सुरु झाली आहे. नगर तालुक्यातील तब्बल 68 चारा छावणी संस्थांवर रात्री उशीरापर्यंत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटींची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाच्या या दणक्याने छावणीचालकांमध्ये घबराट उडाली आहे.

जिल्ह्यात 2012-13 व 2013-14 या दोन वर्षांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. या दुष्काळी परिस्थितीत पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळणे दुरापस्त झाले होते. चार्‍याअभावी जनावरे खाटकाला विकण्याची वेळ पशुपालकांवर आली होती. जनावरे वाचविण्यासाठी चारा छावणी आणि चारा डेपो सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी, विविध पक्षांच्या नेत्यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने चारा डेपो व चारा छावणी सुर करण्याचा निर्णय घेतला. छावण्या चालविण्यासाठी सहकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्था मोठ्या प्रमाणात पुढे आल्या होत्या. . 

जिल्ह्यात दोन वर्षांच्या दुष्काळात तब्बल 426 छावण्या सुरु होत्या. शेतकर्‍यांनी या छावण्यात जनावरे दाखल केली. या जनावरांसाठी पाणी, चारा, निवारा आणि औषधे आदीपोटी शासनाकडून या छावणीचालकांना प्रति जनावर निधी उपलब्ध केला जात होता. छावणीचालक शासनाच्या नियमानुसार चारा, पाणी दिला जात नाही, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या. त्यावेळी शासनाने बहुतांश छावण्याची तपासणी करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. छावण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली असल्याच्या तक्रारी शासनाकडे काहींनी दाखल केल्या. याबाबत न्यायालयात देखील याचिका दाखल झाल्या होत्या. अनियमितता आढळून आलेल्या छावणी संस्थांवर तात्काळ गुन्हे दागल करा, असे आदेश न्यायालयाने दिले.

त्यानुसार शासनाने 6 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. ज्या संस्थाचालकांनी अनियमितता केली. त्या संस्था आणि त्यातील पदाधिकार्‍यांना काळया यादीत टाका, दंडात्मक कारवाई झाली असली तरीही संबंधित छावणीचालक वा संस्थांवर गुन्हे दाखल करा, वारंवार अनियमितता असणार्‍या संस्थावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्‍त झाले. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. 

अनेक महिन्यांच्या विलंबानंतर तहसीलदारांनी गुन्हे दाखल करण्याचे काम हाती घेतले आहे. नगर तहसीलदारांनी ही प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार एकूण 71 पैकी 68 चारा छावणी संस्थांवर काल (दि.6) रात्री उशीरापर्यंत नगर, भिंगार, एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यामध्ये तालुक्यातील कापूरवाडी, कोल्हेवाडी, मजले चिंचोली, अंबिलवाडी, गुंडेगाव आदी गावांतील विविध सहकारी विकास सेवा सोसायटी व स्वयंसेवा संस्थांचा समावेश आहे.प्रशासनाच्या या कारवाईने  गावपातळीवरील पुढार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.