होमपेज › Ahamadnagar › मराठा समाजास आरक्षण देणे शक्य

मराठा समाजास आरक्षण देणे शक्य

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:44PMजामखेड : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा 50 टक्के ठेवली असली, तरी त्या आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर सरकारने तत्काळ विधिमंडळाचे अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. कारण मराठा समाज हा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास आहे, असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

येथील जिव्हाळा फाउंडेशनतर्फे मराठा आरक्षणाबाबत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा. मधुकर राळेभात, सिद्धार्थ घायतडक, गुलाब जांभळे, अवधूत पवार, राम निकम, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, संभाजी ढोले, बबन काशिद, डॉ. कल्याणराव काशिद, दत्तात्रय वारे, शहाजी डोके, खलील मैलाना, संजय वराट, संतोष उगले, नगरसेवक पवन राळेभात, डिगंबर चव्हाण, अमित जाधव, डॉ. कैलास हजारे, अरुण जाधव यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले, मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर व पोटासाठी स्थलांतरीत काम करणारे सर्वांत जास्त मराठा समाजाचे नागरिक आहेत. जमीनदार तीन टक्के समाज वजा केला, तर 97 टक्के मराठा समाजापैकी 82 टक्के अल्पभूधारक, तर उर्वरित भूमिहीन आहे. अनेक वेळा मराठा समाजाच्या ताब्यात सत्ता आहे, असा आक्षेप घेतला जातो. मात्र निष्क्रिय मराठा नेते आणि आक्षेप या कात्रीत बहुसंख्य गरीब मराठा समाज अडकलेला आहे. राजकारणात बहुसंख्य मराठा नेते आहेत. मात्र हा लोकसंख्येचा परिणाम आहे. लोकशाहीचे तत्व असे आहे जितनी जिनकी संख्या भारी, उतनी उनकी भागीदारी. त्यामुळे बहुसंख्य मराठा राजकारण्यांवरील राग मराठ्यांना आरक्षण देण्याबाब काढणे हे, न्यायाला धरून नाही.

आर्थिक निकषावर गरिबांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जाते. मात्र आजचा गरीब उद्याचा श्रीमंत असू शकतो. म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण मिळणे कठीण आहे. कारण आर्थिक निकषावर आरक्षण ही संविधानात तरतूद नाही. जातीव्यवस्था व धर्म व्यवस्था यामुळे सरकार जाणीवपूर्वक आरक्षण देण्याचे टाळाटाळ करीत आहे. मराठा अरक्षणाचा सध्या ज्वलंत प्रश्न आहे. 

भारतीय राज्यघटनेत कलम 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांना आरक्षण या न्यायकक्षेत मराठा समाज येतो. त्यामुळे आरक्षण हा मराठा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करावीत. कुणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.