Mon, Nov 19, 2018 09:29



होमपेज › Ahamadnagar › फरार आरोपींची संपत्ती होणार जप्त?

फरार आरोपींची संपत्ती होणार जप्त?

Published On: Jun 25 2018 1:44AM | Last Updated: Jun 24 2018 11:16PM



नगर : प्रतिनिधी

गेल्या डिसेंबर महिन्यात शनी शिंगणापूर येथे गुंड गणेश भुतकर याची सिनेस्टाईल हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी न्यायालयात दीड महिन्यापूर्वी दोषारोपपत्र सादर केले. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. राज्यभरात जात गुन्हेगारांना पकडणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील दोघे फरार आरोपी सापडलेले नाहीत. त्यामुळे या आरोपींच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज न्यायालयात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगर शहरात मध्यंतरी आर्थिक घोटाळ्याशी निगडित एका प्रकरणात फरार आरोपी सापडत नसल्याने त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी अर्ज दिला होता. त्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. भुतकर हत्या प्रकरणात पोलिसांनी संपत्ती जप्त करण्याचा अर्ज न्यायालयात दिला असून, न्यायालयीन आदेशानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.20 डिसेंबर 2017 रोजी गुंड गणेश भुतकर याची हत्या झाली होती. भूतकर हा त्याच्या हाँटेलवर आला होता. त्यावेळी स्काँर्पिओतून त्याचा मित्र अविनाश बानकर व त्याचे साथीदार आले. त्यांनी भूतकर याच्यावर कुर्‍हाडीने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने भूतकरचा मृत्यू झाला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

घोडेगाव रस्त्यावरील इको बँकेसमोरच्या दत्तू बानकर यांच्या पार्किंगमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मृत गणेशवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना मारहाण करणे, शनी चौथर्‍यावर जाऊन कर्मचार्‍यांना धमकावणे, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे असे विविध गुन्हे त्याच्यावर होते. त्यामुळे भूतकारला तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतांना शनी शिंगणापुरात आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती.यापूर्वी पंकज बानकर, मयुर हरकळ, अर्जुन महाले या तीन आरोपींना पोलिसांनी दोन दिवसांमध्येच अटक केली होती. दरम्यान भुतकर खून प्रकरणातील आरोपी गंगापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे कारवाई करत लखन नामदेव ढगे व भाऊसाहेब उर्फ दादासाहेब रायभान ढमाले दोघांना अटक केली. या प्रकरणात अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोन प्रमुख आरोपी पोलिस दफ्तरी अद्यापही फरारच आहेत.