Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Ahamadnagar › पोलिस भरतीत उमेदवारांच्या हाताला बसविणार ‘चीप’

पोलिस भरतीत उमेदवारांच्या हाताला ‘चीप’

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 1:52AMनगर : प्रतिनिधी

पोलिस भरतीतील गुणांकनातील गैरप्रकार टाळण्यासाठी 1 हजार 600 मीटर धावण्याच्या चाचणीतील उमेदवारांची वेळ मोजण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेप्रमाणे हाताला ‘चीप’ बसविली जाणार आहे. तसेच छाती, उंची मोजल्यानंतर पात्र उमेदवारांचे बायोमॅट्रिक मशीनवर अंगठ्याचे ठसे घेतले जातील. लेखी परीक्षेवेळी थंप ‘मॅच’ होणार्‍यांना प्रवेश मिळेल, असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 5) पत्रकारांशी बोलताना दिली. 

जिल्हा पोलिस प्रशासनातील 210 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्यातील 46 जागा राज्य राखीव पोलिस दल व अनुकंपासाठी राखीव आहेत. उर्वरीत 164 जागांसाठी 31 हजार उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शीपणे व्हावी, यासाठी भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. 100 मीटर धावण्याच्या चाचणीत ‘चीप’चा प्रयोग राबविणे कठीण आहे. मात्र, 1 हजार 600 मीटर धावण्यासाठी नगर जिल्ह्यात तो पहिल्यांदा राबविण्यात येणार आहे. 

काही उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणी देतात व लेखी परीक्षेसाठी ‘तोतया’ व्यक्तीला पाठवितात. या प्रकाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी छाती, उंचीत पात्र झाल्यानंतर उमेदवारांचे अंगठ्याचे ठसे मशीनवर घेण्यात येतील. लेखी परीक्षेवेळी ठसे जुळणार्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. लेखी परीक्षेत कॉपी होऊ नये, यासाठी 20 उमेदवारांवर एक अधिकारी लक्ष ठेवेल. गैरप्रकार करणार्‍या उमेदवारास भरतीतून अपात्र ठरविण्यात येईल. 

12 मार्चपासून पहाटे पाच वाजता एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक दिवसाला दीड हजार उमेदवारांना पाचारण करण्यात येईल. सुमारे महिनाभर ही भरती प्रक्रिया चालेल. उमेदवारांना‘ एसएमएस’द्वारे मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची वेळ कळविले जाणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.