Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Ahamadnagar › फौजदाराचा ‘बार’मध्ये धिंगाणा

फौजदाराचा ‘बार’मध्ये धिंगाणा

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:26AMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

शहरातील शेवगाव रस्त्यावरील हॉटेल मधुबनमध्ये दारूच्या नशेत सैराट झालेल्या फौजदाराने बंदुकीचा धाक दाखवत चांगलाच राडा घातला.या फौजदाराला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पाथर्डी पोलिस ठाण्यातील फौजदाराला देखील धक्काबुक्की करत त्याने श्रीमुखात भडकावली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात फौजदार अमोल तानाजी मालुसरे (नेमणूक गेवराई पोलिस ठाणे) याच्यासह इतरांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गेवराई पोलिस ठाण्यात नेमणुकीस असणार्‍या फौजदाराला तारकेश्वर गडावर बंदोबस्त कामी नेमण्यात आले होते. बंदोबस्त उरकून पाथर्डीत आलेला फौजदार अमोल तानाजी मालुसरे व त्याचे 3 साथीदार शेवगाव रस्त्यावरील हॉटेल मधुबन येथे दुपारी बारा वाजता दारू पिण्यासाठी बसले होते.दुपारी बारा वाजता बसलेल्या चार जणांनी सायंकाळपर्यंत 19 बिअरच्या बाटल्या रिचवल्या. त्यामुळे फौजदार मालुसरे व त्याचे साथीदार चांगलेच दारूच्या नशेत सैराट झाले होते. सायंकाळी फौजदार मालुसरे याची त्याच्या सोबत्याबरोबर  चांगलीच बाचाबाची झाली. 

यावेळी बिअरच्या बाटल्या देखील त्याने टेबलवर फोडल्या. त्यानंतर साडेसातच्या सुमारास आतमध्ये बसलेला फौजदार बाहेर हॉटेलच्या काउंटरवर येत हॉटेलमध्ये आलेल्या इतर ग्राहकांना दमबाजी व धक्काबुक्की करू लागला. तसेच बंदुकीचा धाक दाखवून काही ग्राहकांच्या कानशिलात देखील लगावल्या. त्यामुळे वाद चांगलाच वाढला होता. तसेच हॉटेलचे 4 हजार 500 रुपये झालेले बिल न देता त्यांनी बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हॉटेल मालकाने बिल मागितले असता त्यांना देखील धमकवण्यात आले. 

हॉटेल चालक मल्हारी शिरसाठ यांनी तात्काळ पाथर्डी पोलिस ठाण्याशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. दोन पोलिस कर्मचार्‍यांनी दुचाकीवरून येत पाहणी केली असता फौजदाराचा रुद्रावतार पाहुन वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर व कर्मचारी हॉटेलमध्ये दाखल झाले. पेठकर यांनी मालुसरे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता दारूच्या नशेत तर्रर्रर्र झालेल्या मालुसरे याने पेठकर यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. 

हॉटेल मालक मल्हारी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव) व त्याचा साथीदार सागर बन्सी तिजोरे (रा. खुंटेफळ, ता. शेवगाव) व अज्ञात साथीदाराविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मालमत्तेचे नुकसान करणे, आर्म अ‍ॅक्ट (3/30), संगनमत करून मारहाण करणे, मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडील बंदूक हस्तगत केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहेत.