होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची वर्दी चोरीस

‘त्या’ पोलिस निरीक्षकाची वर्दी चोरीस

Published On: Aug 14 2018 1:11AM | Last Updated: Aug 13 2018 11:46PMशेवगाव : प्रतिनिधी

शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची खाकी वर्दी त्यांच्या भाड्याच्या घरातून चोरीला गेली आहे. तशी फिर्याद त्यांनीच शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीच्या काही तास अगोदर ओमासे यांनी नवनाथ इसरवाडे व एका व्यक्तीने सव्वालाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. त्यामुळे शेवगाव पोलिस ठाणे चांगलेच चर्चेत आले आहे.  

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शासकीय निवासस्थान उपलब्ध नसल्याने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे हे शहरात विद्यानगर भागात विठ्ठल बडे यांच्या बंगल्यात भाडेतत्वावर राहतात. रविवारी (दि. 12) सकाळी 7 पूर्वी त्यांच्या घरातून सरकारी खाकी गणवेश, टोपी व लाल बूट असे 625 रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. याबाबत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओमासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,‘मी बंगल्यात एकटाच राहतो. माझ्याकडे एक वयस्कर महिला कामाला आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मी पोलिस ठाण्यात जातो. बंगल्यात असणार्‍या शोकेसच्या एका कप्प्यात वापरत नसलेले जुने सात गणवेश, तर दुसर्‍या कप्प्यात वापरत नसलेली गणवेशावरची टोपी आणि दरवाजामागे लाल बूट होते. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शोकेशची साफसफाई करत असताना कप्प्यात सात पैकी पाचच गणवेश असल्याचे निदर्शनास आले. त्यात दोन गणवेश नव्हते. टोपीही नव्हती. दरवाजा मागील बूटही नव्हते. घरकाम करणार्‍या महिलेस याची विचारपूस केली असता तिने काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

पीआयच्या फिर्यादींचा तपास ‘एलसीबी’कडे

बनावट आवाज काढून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची झालेली सव्वासहा लाख रुपयांची फसवणूक व त्यांचा सरकारी गणवेश चोरी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच एका महिलेने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी गैरवर्तन केले, असा तक्रार अर्ज पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सोमवारी (दि. 13) दिला आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांचा खोटा आवाज काढून शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याकडून 6 लाख 20 हजार रुपये उकळण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचा शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल होताच काही तासांच ओमासे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दुसरी फिर्याद दिली आहे. सरकारी वर्दी, बूट, टोपी चोरीला केल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सोमवारी (दि. 13) काढला आहे. 

दरम्यान, या घटनेशी संबंधित आणखी एक घटना घडली आहे. एका महिलेने सोमवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक शर्मा यांची भेट घेऊन पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांची तक्रार केली आहे. तिने अर्जात म्हटले आहे की, ओमासे व त्या महिलेच्या पतीचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे घरी येणे-जाणे होते. त्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन ओमासे यांनी गैरवर्तन केले. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

पोलिस निरीक्षक ओमासे यांनी दिलेली फसवणुकीची फिर्याद, त्यानंतर काही तासांत दिलेली सरकारी गणवेश चोरीची दुसरी फिर्याद व एका महिलेने ओमासे यांच्याविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे दाखल केलेला तक्रार अर्ज, या घटना चांगल्याच चर्चेच्या ठरल्या आहेत. यामागे नेमके कारण काय आहे, याबाबत नागरिकांकडून तर्कविर्तक लावले जात आहेत.

महिलेच्या अर्जाची उपअधीक्षकांकडे चौकशी

एका महिलेने पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महिलेचा अर्ज प्राप्त होताच पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. उपअधीक्षकांच्या चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल.