Mon, Jun 24, 2019 16:40होमपेज › Ahamadnagar › ‘चला हवा येऊ द्या’ ने रसिक भारावले

‘चला हवा येऊ द्या’ ने रसिक भारावले

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 12:20AMकोळपेवाडी : वार्ताहर 

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला कोपरगावच्या इतिहासात प्रथमच गर्दीचा उच्चांक गाठत जवळपास तीस ते पस्तीस हजार रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून खळखळून हसण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

 यंदाही माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची 97 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 10 वा. कारखाना कार्यस्थळावर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली वाहण्यात आली. सायंकाळी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर जयंतीनिमित्त ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी लोकप्रियतेच्या शिखरावर असणार्‍या व साता समुद्रापार जाऊन पोहोचलेल्या मराठी प्रेक्षकांसह हिंदी भाषिक प्रेक्षकांना खळखळून हसविणारा चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, विनित भोंडे, अतुल तोडणकर यांच्या  अफलातून विनोदाने तीन तास एकाच जागी खिळवून ठेवले. त्यांच्या सोबतीला प्रसिद्ध नृत्यांगणा ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकरच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. सारेगमप लिटल चॅम्पस फेम प्रसिद्ध गायक रोहित राऊत, आरोही म्हात्रे यांच्या सुमधूर आवाजात सादर केलेल्या हिंदी, मराठी, पंजाबी गाण्यांनी तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केले.

माझ्या नवर्‍याची बायको फेम गुरु अर्थात अभिजित खांडकेकर यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आला होता. महिलांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित असणार्‍या सर्वच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व खुर्च्या पूर्णपणे भरल्यामुळे हजारो रसिकांनी उभे राहून तर काही रसिकांनी इमारतीच्या गच्चीवरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 

कार्यक्रमस्थळी पाय ठेवण्यासही जागा नव्हती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात हातभार मिळाला. कार्यक्रमासाठी अलोट गर्दी होऊनही उत्कृष्ट नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी उपस्थित असणार्‍या पोलिसांनीही कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमासाठी  शरदचंद्रजी पवार यांचे नातू व बारामती फाउंडेशन अध्यक्षचे रोहित पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार अशोकराव काळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मंजुश्री मुरकुटे, अविनाश आदिक, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे आदी आवर्जून उपस्थित होते.यावेळी उपस्थित नागरिक कार्यक्रमाने भारावून गेले होते.

Tags : Ahmadnagar,  peoples,happy,  Chala Hawa Yeu Dya