होमपेज › Ahamadnagar › ऊस दरवाढीचा निघाला सर्वमान्य तोडगा

ऊस दरवाढीचा निघाला सर्वमान्य तोडगा

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 10:50PM

बुकमार्क करा
पाथर्डी/मढीः प्रतिनिधी

 पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्‍वर कारखान्याच्या ऊस दरवाढी संदर्भात वृद्धेश्‍वरचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे व प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्यातील सकारात्मक चर्चनंतर सर्वमान्य तोडगा निघाला. त्यामुळे येत्या गुरुवार (दि.4) पासून होणारे कारखाना बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. ऊस दरवाढीबाबत तोडगा काढण्यात प्रांताधिकार्‍याच्या शिष्टाईला अखेर यश आले.

ऊस दरवाढी संदर्भात वृद्धेश्‍वर साखर कारखान्याचे प्रवेशद्वारासमोर सत्याग्रह आंदोलन करून गव्हाण बंद आदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आला होता. या आंदोलनाविषयी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला तहसीलदार नामदेव पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगिता डोंगरे,  पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, उस उत्पादकांचे प्रतिनिधी शिवशंकर राजळे, अमोल वाघ, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी शरद मरकड, दत्ता फुंदे व संतोष गायकवाड कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक जालिंदर पवार , सरव्यवस्थापक भास्कर गोरे, ज्येष्ठ संचालक उध्दव वाघ, रामकिसन काकडे व सुभाष ताठे आदी उपस्थित होते.

 गेल्या महिन्यात ऊस दरवाढी संदर्भात दोन वेळा प्रशासकीय बैठका झाल्या, मात्र तोडगा निघू शकला नाही. ज्ञानेश्‍वर व केदारेश्‍वर कारखान्याप्रमाणे उसाचा पहिला हप्ता द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या मुद्द्याशिवाय चर्चा होणार नाही, असा पवित्रा काही काळ आंदोलकांनी घेतला. शेवगाव तालुक्यातील घोटण येथे शेतकरी आंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबारामुळे प्रशासनाने या आंदोलनाकडे गांभीयाने पाहिले होते. वृद्धेश्‍वरचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याची आर्थिक स्थिती, गाळप हंगामासाठी उसाची उपलब्धता, उत्पादन खर्च व बाजारभाव आदी मुद्यावरूंन आढावा घेत निवडक संचालक व अधिकार्‍यांनी कारखान्यातर्फे बाजू मांडून आंदोलकांशी संवाद साधला.

 यामध्ये ऊस भावाबाबत पहिला हप्ता मागणी प्रमाणे देणे अशक्य असून, अंतिम हप्ता इतर कारखान्याच्या भावाप्रमाणे तुलनात्मकदृष्ट्या योग्य ऊस दर देण्याचे मान्य केले. त्यावर समाधान मानत अांदोलन स्थगित केल्याचे आंदोलकांनी जाहीर केले. आंदोलन रोखण्यासंदर्भात बैठकीत जेवढे प्रामाणिक प्रयत्न झाले त्यापेक्षा जास्त घडामोडी पडद्या मागून घडल्या. त्यांची सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे.