Fri, Jul 10, 2020 22:55होमपेज › Ahamadnagar › पाथर्डीत सर्वपक्षिय मोर्चा

पाथर्डीत सर्वपक्षिय मोर्चा

Published On: Dec 22 2017 1:24AM | Last Updated: Dec 21 2017 10:58PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

शहरातील गुंडगिरीचा बिमोड करावा, अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी शहर बंदची हाक देत पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केले. तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्‍वासनांतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.

नाईक चौकातून मोर्चाला सुरवात करण्यात आली. मोर्चा मध्ये ढाकणे यांच्यासह ऋषिकेश ढाकणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संतोष जिरेसाळ, आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन आव्हाड, सीताराम बोरुडे, अमोल बडे, सहदेव शिरसाठ, भाऊसाहेब धस, प्रतिक खेडकर, मुकुंद गर्जे, रवी आरोळे, योगेश रासने, कृष्णा आंधळे, चंद्रकांत भापकर, किरण पालवे, वसंतदादा विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील गुंडगिरी संपलीच पाहिजे, अवैध धंदे बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा पोलिस ठाण्यावर गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. 

यावेळी ढाकणे म्हणाले की, शहरातील गुंडगिरीने डोके वर काढले असून शहरात कुहेही पोलिसांचे अस्तित्व दिसून येत नाही. शहरात वाहने अस्त व्यस्त लावल्याने लोकांना पायी चालता येत नाही. गावगुंडाचा बंदोबस्त करण्यास पोलिस असमर्थ ठरले आहेत. शहरात व तालुक्यात पोलिसांचे कुठेही आस्तित्व दिसत नाही. शहर पोलिस चौकी कायम बंद असते. खुलेआम मटक्याच्या टपर्‍या, वेडीवाकडी लावलेली वाहने, मुलींची होणारी छेडछाड दरदिवशी होणार्‍या मार्‍यामार्‍यांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. पोलिसांना हप्ते मिळत असल्याने गुन्हेगारांचे फावत असून दोन्ही बसस्थानकावर खिसेकापूंचा मोठा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांना हप्ते कमी पडत असेल तर आपण देऊ. मात्र एकदाची गुंडगिरी मोडून काढा. मी संपूर्ण राज्यात फिरतो. मात्र पाथर्डी इतकी गुंडगिरी कुठे दिसून येत नाही. मी शांत आहे, याचा गैरअर्थ घेऊ नका. मला शांत ठेवायचे असेल तर एकदाच गुंडांचे कंबर मोडून काढा. अन्यथा या पेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी शेवटी दिला. 

आपचे किसन आव्हाड यांनी तर पोलिसांच्या हप्त्यांचे ‘रेटकार्ड’च मोर्चासमोर वाचून दाखविले. काही वक्त्यांनी पत्रकारांवरही तोंडसुख घेतले. पाथर्डीची कोपर्डी होण्याची वाट पोलिस पहात आहेत का, असा सवालही काहींनी उपस्थित केला. अनेक वर्षानंतर निष्क्रीय पोलिसांच्या विरोधात शहरात कडकडीत बंद पाळून नागरिकांनी उस्फूर्त आंदोलन केले. विद्यार्थिनी ताई आघाव हिने मुलींच्या छेडछाडीच्या व्यथा मांडल्या. तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने कारवाई करु, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.