Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Ahamadnagar › आरोपीं न सापडल्यास संपत्ती जप्तीबाबत कायदेशीर प्रक्रिया

आरोपीं न सापडल्यास संपत्ती जप्तीबाबत कायदेशीर प्रक्रिया

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:02AMनगर : प्रतिनिधी

पोलिसांकडून पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. परंतु, ते न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून संपत्ती जप्तीबाबतची कायदेशीर प्रक्रिया व्हावी, यासाठी पोलिसांकडून न्यायालयात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. तसेच बजेट रजिस्टर घेऊन अधिकार्‍यांना सोमवारी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. ठेकेदाराच्या जबाबातील एका लिपिकाचीही याचदिवशी चौकशी करण्यात येणार आहे.

पथदिवे घोटाळाप्रकरणी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (दि. 29) तोफखाना पोलिस ठाण्यात दोन अधिकारी, एक लिपिक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील एकच आरोपी लिपिक भरत काळे याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा कसून शोध सुरू आहे. मात्र, ते अद्याप हाती लागलेले नाहीत. फरार आरोपी न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून संपत्ती जप्तीबाबतची पोलिसांकडून न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

तसेच पथदिवे घोटाळ्यातील 34 लाख रुपयांच्या कामांची बजेट रजिस्टरच्या नोंदीबाबतचा पुरावा गोळा करण्यासाठी पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी महापालिका अधिकार्‍यांकडे बजेट रजिस्टर मागिविले आहे. ते रजिस्टर घेऊन अधिकार्‍यांना सोमवारी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आलेले आहे. आरोपी असलेला ठेकेदार सचिन लोटके याने त्याच्या जबाबात एका लिपिकाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यालाही सोमवारी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आलेले आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.