Tue, May 21, 2019 00:21होमपेज › Ahamadnagar › पठार भागात आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न

पठार भागात आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 22 2017 9:19PM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पठारावर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून काल पहाटे गुंजाळवाडी पठारावर एकाचवेळी सात ते आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला.  एका वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाढत्या चोरीच्या घटनांनी संगमनेर तालुका हादरलेला असताना पठारावरील या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत. 

काल पहाटेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या गुंजाळवाडी पठारावर चोरट्यांनी हल्लाबोल केला. अंदाजे आठ ते दहाच्या संख्येने असलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला भिकूबाई हौशीराम आगलावे यांच्या घरात प्रवेश केला. चोर घरात घुसल्याची कुणकूण लागूनही त्यांना भीतीपोटी काहीही करता आले नाही. तशाच अवस्थेत चोरांनी त्यांच्या कानातील सोन्याचे डुल, कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या तीन नथ व तीर्थाटनासाठी पोटतिडकीने साठवून ठेवलेली 20 हजारांची रक्कम असा सुमारे 30 हजारांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केला. 

याचवेळी अन्य चोरट्यांनी परिसरातील पवन नामदेव वाळुंज, राजेंद्र संपत वाळुंज, कारभारी हरिभाऊ आगलावे, विमल शिरसाठ यांच्यासह 7 ते 8 घरांतही चोरीचा प्रयत्न केला. एकाचवेळी सात-आठ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने त्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे होऊ लागले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. याबाबत घारगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 

पोलिस उपनिरीक्षक अंसार इनामदार यांनी सकाळी फौजफाट्यासह गुंजाळवाडी पठारावर भेट देऊन घटनेची माहिती घेतली. चोरट्यांचे वर्णन, देहबोली, अंगातील कपडे, बोलीभाषा आदींच्या आधारे चोरटे परिसरातीलच असावेत ,असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. त्यादृष्टिने पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.