Sun, Jul 21, 2019 00:06होमपेज › Ahamadnagar › ‘ज्ञान प्रधान युगाकडे’ देशाची वाटचाल

‘ज्ञान प्रधान युगाकडे’ देशाची वाटचाल

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 1:15AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शेतीप्रधान युगाकडून सुरू झालेली आपल्या  देशाची वाटचाल आता ज्ञानप्रधान युगाकडे जात आहे. यामध्ये उपलब्ध होणार्‍या संधी या खूप मोठ्या आहेत. नवीन ग्राम रचनेसाठी या ज्ञान प्रधान युगाचा सेतू निर्माण करण्यासाठी प्रवरा परिसराने आणखी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्‍त केली.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 118 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कार वितरण आणि शेतकरी दिनाच्या समारंभात डॉ. काकोडकर यांनी ज्ञानावर आधारित नव्या ग्रामरचनेची संकल्पना विषद केली. प्रवरा परिवाराने यापूर्वी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरा मॉडेल तयार केले होते. त्या आधारेच ज्ञानावर आधारित ग्रामरचनेचे नवीन मॉडेल तयार करण्याची महत्वपूर्ण सूचना केली.

संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्‍न झालेल्या या शानदार सोहळ्यास 91 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. भाऊसाहेब कांबळे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, जि. प. च्या अध्यक्षा  शालिनी विखे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र विखे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या वर्षीचे साहित्य पुरस्कार वितरीत करण्यात आले. 

यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार साहित्यिक बाबाराव मुसळे आणि विशेष साहित्य गौरव पुरस्कार महेश लोंढे, जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार हेरंब कुलकर्णी आणि डॉ. विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्कार डॉ. बाळ ज. बोठे यांना देवून सन्मानित करण्यात आले.यावर्षीचा कलागौरव पुरस्कार अभिनेते मिलिंद शिंदे आणि समाजप्रबोधन पुरस्कार हभप.शामसुंदर महाराज सोन्‍नर यांना देवून गौरविण्यात आले. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेम्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून पद्मश्रींनी मांडलेल्या विचारांमध्ये शेतकर्‍यांचा सिध्दांत आणि आवाज होता. विचारवंत मार्क्सनेही मांडलेल्या विचारांमध्ये सहकार हाच पर्याय सुचविला. याकडे लक्ष वेधून डॉ. मोरे यांनी सांगितले की, सहकाराच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा पाया हा प्रगतीसाठी प्रेरक ठरला. त्याच पद्मश्रींच्या विचाराने या परिसराची सुरू असलेली वाटचाल ही महत्वाची वाटते. 

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या विचारातून पुरोगामित्वाचा विचार सहजपणे समोर येतो. कोणतेही साहित्य आणि कला हे मानवाला जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. पण लेखक कलावंतानी आता आधुनिकतेचे मूल्य स्वीकारले पाहीजे. उद्याची पहाट उगविण्यासाठी शासनच सर्व करेल या भ्रमात तुम्ही राहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी प्राचार्य रा. र. बोराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी ना. विखे यांनी साहित्य पुरस्कारामागची भूमिका विषद करून उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले.