होमपेज › Ahamadnagar › गुन्ह्याच्या बडग्यामुळे शिक्षकांमध्ये प्रक्षोभ

गुन्ह्याच्या बडग्यामुळे शिक्षकांमध्ये प्रक्षोभ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी

मतदार नोंदणी कामावर बहिष्कार टाकणार्‍या तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रांताधिकार्‍यांच्या नोटीसांमुळे सोमवारी सकाळी पारनेर येथे शिक्षकांचा प्रक्षोभ पहायला मिळाला. बहिष्काराच्या निवेदनानंतर ज्या पद्धतीने हे प्रकरण हातळले गेले त्याचा पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत निषेध करून शिक्षकांची बाजू उचलून धरली. दरम्यान, नोटीस बजावताच सर्वच शिक्षकांनी बहिष्काराचे अस्त्र मागे घेऊन मतदार नोंदणी कामास सुरूवातही केली. 

राष्ट्रीय कामावर बहिष्कार टाकण्याच्या प्राथमिक शिक्षकांच्या भूमिकेनंतर निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. काही शिक्षकांना तशा नोटीसाही रविवारी बजावण्यात आल्या होत्या. शिक्षकांच्या बहिष्काराच्या निवेदनाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्यानंतर आयोगाने तातडीने दखल घेत काम नाकरणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तशा नोटीसा बजाण्यास सुरूवात झाल्यानंतर शिक्षकांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला. सोमवारी सकाळी बहिष्कार टाकणारे शिक्षक तहसील कार्यालयात उपस्थित झाले. सभापती राहुल झावरे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, डॉ. श्रीकांत पठारे यांनाही बोलावण्यात आले. तेथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.

एक शिक्षकी शाळेतील शिक्षकाने हे काम कसे करायचे, शाळा सोडून काम करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांचे काय, शिक्षक वर्गात नसेल तर विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तेवर परिणाम होईल, त्यास जबाबदार कोण, असे अनेक प्रश्‍न विचारून शिक्षकांनी दिवाण यांना भांडावून सोडले. इतकी वर्षे आम्हीच ही कामे केली. यापुढील काळात हे काम आमच्याकडे नकोच अशी भूमिकाही मांडली. यावेळी राहुल झावरे म्हणाले की, राष्ट्रीय कामांची सर्व शिक्षकांना जाणीव आहे. बहिष्काराचा प्रश्‍न किचकट आहे. मात्र प्रश्‍न ज्या पद्धतीने हाताळला गेला, तो निषेधार्ह आहे. शिक्षकांनी ऐकले नसते तर कारवाईच्या नोटीसा ठिक होत्या. कारवाईसंदर्भात आतातायीपणा करण्यात आला. त्याचा आपण धिक्कार करीत असल्याचे ते म्हणाले. 

हा प्रश्‍न स्थानिक पातळीवर सुटणार नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. विजय औटी यांच्या माध्यमातून विधीमंडळात हा प्रश्‍न मांडावा लागेल. तेथे यश मिळाले नाही तर न्यायालयात जावे लागेल. शिक्षक संघटनांनी लढा देण्याचा निर्धार केल्यास आपण विखे यांच्यापर्यंत हा प्रश्‍न मांडू. झावरे यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेऊन काम करण्याची तयारी दर्शविली.