Fri, Apr 26, 2019 18:15होमपेज › Ahamadnagar › सनदशीर मार्गाने निषेध

सनदशीर मार्गाने निषेध

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 9:59PM

बुकमार्क करा
पारनेर : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे घडलेल्या दंगलीचे पारनेर तालुक्यात कोठेही पडसाद उमटले नाहीत. दलित संघटनांनी बंदचे आवाहन न करता दलित व दलितेतर नागरिकांनी एकत्र येत विविध ठिकाणी निवेदने देऊन सनदशीर मार्गाने निषेध नोंदविला. तालुक्याचा पुरोगामी वारसा पुन्हा एकदा अधोरेखीत केला. 

1 जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकारानंतर त्याची माहिती काही क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपर्‍यात परसली. मात्र गेल्या तीन दिवसांत त्याचे कोठेही तीव्र पडसाद उमटले नाहीत. महार बटालियनच्या शुरविरांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील तरूणही कोरेगाव भिमा येथे गेले होते. जमावावर हल्‍ला झाला त्यावेळी हे तरूणही त्यात अडकले होते. पोलिसांच्या मदतीने ते तेथून बाहेर पडले व सुखरूपपणे पारनेरमध्ये पोहचले. अभिवादनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर विशेषतः नाशिक जिल्हा तसेच संगमनेरकडे जाणार्‍या तरूणांच्या अनेक गाड्या तालुक्यातून गेल्या. नगर-पुणे महामार्गावर दंगलीचा भडका उडालेला असताना तालुक्यातून जाणार्‍या याच मार्गावर मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, हेही विशेष. तालुक्यातून जाणार्‍या विविध रस्त्यांवरील प्रवाशांना कोठेही प्रतिबंध झाला नाही. तालुक्यातून ते सुखरूपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहचले. 

घटनेनंतर पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे, सुपे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दलीत संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन शांततेचे अवाहन केले. मुळातच पुरागामीत्वाचा वारसा असलेल्या तालुक्यातील संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आहवानास प्रतिसाद देत शांतता राखण्याचे अभिवचन दिले व ते पाळलेही. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तालुक्यातील दलित संघटनांनी मात्र बंदचे आवाहन न करता सनदशीर मार्गाने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर करताना दलितांसह दलितेतर नागरिकही सहभागी झाले होते. बंदच पुकारण्यात न आल्याने तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. सुपे येथील आठवडे बाजारही दिवसभर सुरळीत होता. पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेलाही भाविकांचा नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद  लाभला. 
सुपे येथे पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांना निवेदन देताना भारत मुक्‍ती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अमित जाधव, पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, शिरीष साळवे, सरपंच भाऊशेठ पवार, उपसरपंच राजूशेठ शेख, योगेश रोकडे, कानिफ पोपळघट, बाळासाहेब अवचिते, सतिश सूर्यवंशी, रिकी जाधव, दीपक सुर्यवंशी, अतिष सूर्यवंशी, सागर सोनवणे, स्वप्निल धोत्रे, अशोक पंडीत, रविंद्र साळवे, किरण वाघचौरे, सागर गायकवाड, बाळासाहेब जाधव, भागवत जाधव, गोरख सुर्यवंशी, वसंत कसबे, नितीन पाडळे, जिवन घंगाळे, दिनकर जाधव, सुधिर सोनवणे, दीपक जाधव, सागर सूर्यवंशी, योगेश कांबळे आदी उपस्थित होते.