Sat, May 25, 2019 23:33होमपेज › Ahamadnagar › पारनेरला पुरोगामी संघटनांचा बंद

पारनेरला पुरोगामी संघटनांचा बंद

Published On: Jan 05 2018 1:04AM | Last Updated: Jan 04 2018 10:30PM

बुकमार्क करा
पारनेर : प्रतिनिधी    

कोरेगाव भीमा येथील दंगल घडविणार्‍यांना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करतानाच बहुजन समाजाने मनुवाद्यांच्या षडयंत्राला बळी न पडण्याचे आवाहन विविध पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय निषेध सभेत करण्यात आले. 

कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तालुक्यातील दलित तसेच पुरोगामी संघटनांच्या कार्याकर्त्यांनी बंद न पाळता सनदशिर मार्गाने, शांततेत निषेध नोंदविला होता. मात्र बंदमध्ये सहभागी न झाल्याने तालुक्यात उजव्या विचारसरणीचे वर्चस्व प्रस्तापित झाले असल्याचा चुकीचा संदेश जाईल, असा विचार पुढे आल्याने काल पारनेर बंदचे आवाहन करण्यात आले. येथील बसस्थानक चौकात निषेध सभा घेण्यात आली. शहरवासीयांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला. बंदमधून शाळा, महाविद्यालये, एसटी सरकारी कार्यालये, पतसंस्था तसेच बँका यांना वगळण्यात आले होते. बंद शांततेत पार पडला.

निषेध सभेसाठी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, भारत मुक्ती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर नगरे, माजी सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नगरे, राष्ट्रीय काँग्रेसचे हसन राजे, शैलेंद्र औटी, युवराज पठारे, शिवसेनेचे शिरीष साळवे, गिरीष साळवे, संपत नगरे, अमित जाधव, बबन वाबळे, भारिप बहुजन महासंघाचे बाळासाहेब कांबळे, बी. एस. पी. चे देवदत्त साळवे, नगरसेविका वर्षा नगरे, सुनीता शिंदे, सचिन नगरे, संजय मते, नगरसेवक डॉ. मुदस्सिर सय्यद, बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब मते, प्रल्हाद शिंदे, गोकुळ शिंदे, सखाराम पातारे, मनसेचे वसिम राजे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले, कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रकार निषेधार्ह व संतापजनक आहे. तालुक्यातील चळवळीतील पुरोगामी संघटनांनी तालुक्यात कोणताही अनूचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली. तसेच तरुणांची माथी भडकविणार्‍या प्रवृत्तींच्या षडयंत्राला बळी न पडण्याचे आवाहन केले. 

भारत मुक्ती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर यांनी मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे, आनंद दवे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी बहुजन समाजे, दलित व दलितेतर समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून, तो बहुजन समाजाने हाणून पाडला, असे सांगितले. शंकर नगरे, बबन वाबळे, सचिन नगरे, सुभाष औटी, अमित जाधव यांचीही भाषणे झाली. सभेनंतर तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले.