Thu, Jun 27, 2019 17:44होमपेज › Ahamadnagar › पोलिसांनी केली बारा आंदोलकांना अटक

पोलिसांनी केली बारा आंदोलकांना अटक

Published On: Aug 31 2018 1:36AM | Last Updated: Aug 31 2018 12:08AMपारनेर : प्रतिनिधी

आ. विजय औटी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तसेच जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पारनेर, भाळवणी व जवळा येथील मराठा क्रांती मोर्चाच्या 24 कार्यकर्त्यांविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पारनेरच्या 12 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी तो घेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. परंतु जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सदस्य वसंत चेडे यांनी मध्यस्ती केल्यानंतर सायंकाळी या कार्यकर्त्यांनी जामीन घेतला.

वडनेर बुद्रूक येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. औटी यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरले होते. फेसबुकवरून थेट प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाची चित्रफीत क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्यानंतर औटी यांच्या त्या वक्तव्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. आ. औटी यांनी आपल्या भाषणाची तोडफोड करून आपणास बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा केला. बुधवारी पारनेर, जवळा, भाळवणी येथे आ. औटी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सुपा येथे पुतळा दहनास  पोलिसांनी मज्जाव केला. टाकळी ढोकेश्‍वर येथे औटींच्या छायाचित्रास काळे फासण्यात आले होते.  

जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदीचा आदेश असल्याने पोलिस प्रशासनाने कोणत्याही आंदोलनास परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलने झाल्याने विविध आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पारनेर येथे  पो. कॉ. रमेश विलास थोरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रितेश कुशाबा पानमंद (वय 25 रा . गोरेगाव), विजय सदाशिव औटी (वय 32), संजय भास्कर वाघमारे (वय 52), प्रशांत संपतराव औटी (वय 48), योगेश अशोक मते (वय 35), तुषार बाबासाहेब औटी (वय 31), बाळासाहेब सुखदेव शेटे (वय 46), अनिकेत रमेश औटी (वय 28), शंकर ताराचंद नगरे (वय 40), प्रल्हाद राजराम शिंदे (वय 50), धीरज सुधाकर महांडुळे (वय 26, सर्व रा. पारनेर), भानुदास पांडुरंग साळवे (वय 34, रा. पिंप्रीजलसेन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना गुरूवारी सकाळीच अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सायंकाळी सुजित झावरे व वसंत चेडे यांनी मध्यस्ती केल्यानंतर या आरोपींनी जामीन घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

पो. ना. रियाज सुभान पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाळवणी येथील अशोक उर्फ बबलू शिवाजी रोहोकले, संभाजी देवराम रोहोकले, निशिकांत सुखदेव रोहोकले, सुरेश उर्फ पिनू नानासाहेब रोहोकले, अशोक लबडे व इतर 4 ते 5 जणांविरोधात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन तसेच आ. औटी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जवळे येथे पो. कॉ. शिवाजी कावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाउसाहेब प्रकाश आढाव, सुनिल रभाजी लंके, पांडुरंग पंढरीनाथ आढाव, विलास चंदर सालके, अरूण बाबाजी रासकर, बाजीराव बारशिले, अनिल रासकर यांच्यासह इतर 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्वजण बुधवारी सकाळी जवळे बसस्थानक परिसरात आ. औटी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. त्यांनी औटी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले होते. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदन पारनेर नगरपंचायतीतर्फे नगराध्यक्ष वर्षा नगरे व नगरसेवकांनी पोलिस निरीक्षक तसेच तहसीलदारांना सादर करण्यात आले.