Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Ahamadnagar › देवस्‍थान जमीन विक्री; चौकशीचे आदेश

देवस्‍थान जमीन विक्री; चौकशीचे आदेश

Published On: Mar 19 2018 4:28PM | Last Updated: Mar 19 2018 5:28PMपारनेर : प्रतिनिधी  

देवस्थानचे नाव कमी करून तसेच नवा फेर तयार करून ढवळपूरी येथील 137 एकर जमिनीची करण्यात आलेली बेकायदेशीर विक्री विधानभेत सोमवारी चांगलीच गाजली! आ. विजय औटी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात अतिशय त्रोटक माहिती असल्याने आ. औटी यांच्यासह इतर 8 सदस्यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. या व्यवहारातील फेरफार रोखण्यात येऊन या प्रकरणाची तसेच आमदार औटी यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची महसूल आयुक्तांकडून तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी दिले. 

ढवळपूरीतील लक्ष्मीनारायण विष्णू मंदिराच्या 137 एकर जमिनीच्या बेकादेशीर विक्रीच्या हालचाली सुरू झाल्यापासून दै. पुढारीने त्याविरोधात आवाज उठविला होता. गेल्या चार पिढंयापासून 26 कुळे या जमिनी कसत होती. जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्यामुळे ही कुटूंबे उघडयावर पडली आहेत. तालुक्यातील जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना अवघ्या 11 कोटींमध्ये तब्बल 137 एकर जमिनींची विक्री करण्यात आली.

आमदार औटी यांनी सोमवारी यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे सादर करित विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. या तक्रारीवर घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी उपस्थित राहून त्यांच्या नावाने खोटया सहया करून सरकार दरबारी खोटी निवेदने सादर केल्याचे उत्तर महसूल मंत्र्यांनी दिले. धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या परवाणगी आदेशानुसार नोंदणी नियम 1961 नुसार खरेदीखत नोंदविण्यात आल्याचेही मत्र्यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरावर समाधान न झाल्याने आ. औटी यांच्यासह आ. गणतपराव देशमुख, सुधाकर देशमुख, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. आ. सुधाकर देशमुख हे बोलत असताना आ. संजय कुंटे हे वारंवार व्यत्यय आणत होते. त्यावर कुंटे तुम्ही मंत्री पाटील यांचे वकील आहात का असे देशमुख यांनी त्यांना सुनावले. अखेर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची तसेच आ. औटी यांनी घेतलेल्या आक्षेपांची महसूल आयुक्तांकडून तिन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिले.