Sun, Jul 21, 2019 08:26



होमपेज › Ahamadnagar › एसटीचे दोन कर्मचारी निलंबित

एसटीचे दोन कर्मचारी निलंबित

Published On: Jan 17 2018 1:55AM | Last Updated: Jan 16 2018 10:20PM

बुकमार्क करा




पारनेर : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासांची परस्पर विक्री करून एसटीच्या पारनेर आगारात सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी राम नाणेकर व के. एन. सातपुते यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 

पारनेर आगारात विद्यार्थ्यांना सवलत पास देण्यात येतात. या पासची नोंद करणे बंधनकाराक असते. दररोज जेवढ्या पासची विक्री झाली, त्याची रक्कम त्याच दिवशी आगारातील रोखपालाकडे जमा करून त्याची नोंद काउंटरवरील पुस्तिकेत करावी लागते. मात्र एका विद्यार्थ्यास केवळ 240 रुपयांचा पास देण्यात आला होता. हा विद्यार्थी प्रवास करीत असताना त्या बसच्या वाहकाच्या हा प्रकार लक्षात आला. वाहकाने तो पास ताब्यात घेतला. दोन दिवसांनंतर  80 रुपये मूल्याच्या पासाचे मूल्य पेनच्या मदतीने 180 रुपये करण्यात आल्याचे त्याच वाहकाच्या लक्षात आले व तेथेच विक्री काउंटरवरील अपहाराचा पर्दाफाश झाला. 

संबंधित वाहकाने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर नगरच्या सुरक्षा विभागाने इश्यू सेक्शन, तसेच विक्री काउंटरवरील पुस्तिकेची पाहणी केली असता,दोन वर्षात सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. इश्यू सेक्शनमधील पुस्तिकेत पास नेल्याच्या नोंदी आढळून आल्या. काउंटरवरील पुस्तिकेत मात्र त्याच्या नोंदीच केलेल्या आढळून आल्या नाहीत. काउंटर सांभाळणारे राम नाणेकर व के. एन. सातपुते यांनी हा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गेल्या दोन वर्षांपासून हा अपहार सुरू असताना आगारातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या ही बाब कशी लक्षात आली नाही, याबाबत अश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महामंडळास 10 लाखांचे नुकसान 

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सवलतीची 75 टक्के रक्कम शासनाकडून महामंडळास आदा करण्यात येते. विक्री करण्यात आलेल्या पासचे विवरणच सादर न केल्यामुळे शासनाकडून येणार्‍या सवलतीच्या रकमेची मागणीही न करण्यात आल्याने अपहराच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम महामंडळास मिळू शकली नाही. अपहार, तसेच शासनाकडून मिळणारी सवलत, असे एकूण 10 लाखांचे नुकसान महामंडळास झाले आहे.