Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Ahamadnagar › पुरातन कानिफनाथ मंदिरात विटंबना

पुरातन कानिफनाथ मंदिरात विटंबना

Published On: Sep 12 2018 1:46AM | Last Updated: Sep 12 2018 12:33AMपारनेर : प्रतिनिधी  

तालुक्यातील पळवेखुर्द येथील पुरातन कानिफनाथ मंदिरात अज्ञात इसमाने विटंबना केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 11) उघडकीस आल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत विटंबना करण्यात आलेल्या मंदिराची सफाई न करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांपुढेे मोठा पेच निर्माण झाला आहे.

पळवेखुर्द येथील गाडीलकर मळ्यात हे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी भगवंता जारकड हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पूजा करण्यासाठी गाभार्‍यात गेले असता,  विटंबना झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती सरपंच नानाभाऊ गाडीलकर यांना दिली. त्यानंतर सरपंच गाडीलकर यांच्यासह भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सरपंच गाडीलकर यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक संजयकुमार सोने, सहाय्यक फौजदार कडूस, अजय नांगरे, शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हे कृत्य करणारा इसम तेथे काही पुरावे सोडून गेला का, याची कसून तपासणी करण्यात आली. 

याप्रकरणी भगवान तबाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत विटंबना करण्यात आलेल्या मंदिराची सफाई न करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांपुढे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. तहसीलदार गणेश मरकड यांनीही पोलिसांशी संपर्क करून तपासाबाबत माहिती घेतली.