Wed, Apr 24, 2019 15:41होमपेज › Ahamadnagar › आरक्षणविरोधी आंदोलनाचा अण्णा हजारेंनी केला इन्कार

आरक्षणविरोधी आंदोलनाचा अण्णा हजारेंनी केला इन्कार

Published On: Aug 31 2018 1:36AM | Last Updated: Aug 31 2018 12:16AMपारनेर : प्रतिनिधी

आरक्षणाच्या विरोधात आपण येत्या 6 तारखेपासून आंदोलन करणार असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्ताचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरूवारी (दि.30) पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी व सामोपचाराने असे प्रश्‍न सोडवावेत, अशी अपेक्षाही हजारे यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून हजारे हे आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू करीत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायलर झाल्या आहेत. यासंबंधी आपणाकडे माध्यमांकडूनही विचारणा होत आहे. आरक्षणाच्या विरोधात किंवा समर्थनार्थ आपण कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. 6 सप्टेंबर रोजी आपण आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या असून, जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी, या हेतूने आरक्षणाची तरतूद केली आहे. समतेसाठी आरक्षण असणे आवश्यकही आहे. पण अलिकडच्या काळात आरक्षणाच्या मुद्यावरून वेगवेगळया प्रांतात जी स्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता या मुद्यावरून जातीय सलोखा धोक्यात येईल की काय, अशी शक्यता वाटते. अशा प्रकारे एखाद्या मुद्यावरून सामाजिक अशांतता निर्माण होऊन देशाचे तुकडे होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा संवेदनशील मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी, सामोपचाराने असे प्रश्‍न सोडविण्यात यावेत असे वाटते.