Wed, Mar 20, 2019 03:04होमपेज › Ahamadnagar › पानटपरी चालकाचा भोसकून खून    

पानटपरी चालकाचा भोसकून खून    

Published On: Mar 04 2018 1:46AM | Last Updated: Mar 04 2018 12:52AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

जागेच्या वादावरून पानटपरी चालकाचा तलवारीने भोसकून खून तर त्याच्या भावावर चाकू, तसेच तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल संध्याकाळी 5 वाजता हुसेननगर (फकिरवाडा) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी  दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे. 

साजिद इब्राहिम मिर्झा असे  ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  त्याचा भाऊ समीर इब्राहिम मिर्झा असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. 

वसीम मेहमूद खान, अब्दुल अश्पाक शेख, जुबेर अश्पाक शेख, फिरोज गफार खान, आवाज अश्पाक शेख, मुजमील बागवान, फरजाना फारुक शेख, मौलाना अहमद फारूक शेख (सर्व रा. फकिरवाडा, श्रीरामपूर) तसेच विशाल हरिश्‍चंद्र लाहुंडे व निलेश शिंदे (दोघे रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध असे आरोपींची नावे आहेत. आरिफ इब्राहिम मिर्झा (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मौलाना अहमद फारूक शेख व तजबीर गफार खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
आरिफ मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपले भाऊ घरामध्ये बसलेले असताना वरील सर्व आरोपी घरात घुसले. तुम्ही किरण देशपांडे यांची जागा का विकत घेतली? ती अम्हाला घ्यावयाची होती. आता या जागेच्या मोबदल्यात आम्हाला 10 लाख रुपये द्या, असे म्हणत साजीद व समीर यांच्यावर तलवार, गज, काठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेही गंभीर झाले. साजीद याच्या डोक्यावर तलवारीने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारादरम्यान तो गतप्राण झाला.  

सदरच्या घटनेनंतर साखर कामगार रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी व्यवस्थित प्रकरण हातळल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. आरोपींपैकी जुबेर शेख हा आयूब शेख खून प्रकरणातील आरोपी आहे. या खून खटल्यातून तो निर्दोष सुटला होता. यानंतर त्याने या भागात आपली दहशत निर्माण केली होती. 

घटनेनंतर काही आरोपी हुंडाई कार (एमएच 17 बीएस 0392) मधून पळून गेले. नंतर ही कार नेवासा रस्त्यावरील उड्डानपुलाजवळ आढळून आली. मयताच्या संतप्त नातेवाईकांनी तिची तोडफोड केली. याशिवाय तपासादरम्यान रात्री पोलिसांना खबडी परिसरात एक बेवारस रिक्षा (क्र. एमएच 20 एजी 5234) आढळून आली. या रिक्षात रक्ताने माखलेली तलवार आढळून आली. हल्लेखोर मिर्झा यांच्या घरासमोरून लावून गेलेल्या तीन मोटारसायकली (एमएच 17 एटी 907 व एमएच 20 इएम 3568 एक विना क्रमांक) पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपींच्या शोधासाठी तीन पथके विविध भागात रवाना केली आहेत. नगरचे गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिसही आरोपींच्या मागावर आहेत. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्‍वास पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी व्यक्त केला.