Thu, Aug 22, 2019 08:21होमपेज › Ahamadnagar › छिंदमच्या पुतळ्याला जोडे मारून शिक्षा

छिंदमच्या पुतळ्याला जोडे मारून शिक्षा

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 12:21AMनगर  ; प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याच्या विरोधातील असंतोष शिवजयंतीच्या दिवशीही उफाळून आला. शहरात ठिकठिकाणी छिंदमच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली. तर महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने हायमॅक्सला छिंदमचा पुतळा बांधून प्रतिकात्मक शिक्षा दिली. शुक्रवारी (दि.16) छिंदम याने मनपा कर्मचार्‍याशी संवाद साधतांना छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत आहेत.

काल (दि.19) शिवजयंतीदिनीही शहरात शिवभक्‍तांनी छिंदमचा निषेध नोंदविला. चौपाटी कारंजा परिसरात छत्रपती प्रतिष्ठानने शिवरायांना अभिवादन केल्यानंतर छिंदमच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आचार्य आनंदऋषिजी मार्गावर धार्मिक परीक्षा बोर्डाजवळ छिंदम याच्या निषेधाचा फलक उभारुन त्याला चपलांचा हार घालण्यात आला.

मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौकातील हायमॅक्सला दिवसभर छिंदमचा पुतळा बांधून जोडे-मारो आंदोलन केले. छत्रपती शिवरायांना अभिवान करुन आक्षेपार्ह वक्‍तव्य करणार्‍या छिंदमचा यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान, काल दिवसभरात शहरातून विविध संघटना, शिवभक्‍तांनी दुचाकीला भगवे झेंडे बांधून रॅली काढली. दिल्लीगेट परिसरात आल्यानंतर युवकांकडून छिंदमच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जात होते. त्यामुळे या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.