Wed, Jul 24, 2019 06:09होमपेज › Ahamadnagar › एकतर्फी प्रेमातून गोळ्या झाडून आत्महत्या

एकतर्फी प्रेमातून गोळ्या झाडून आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून परप्रांतीय प्रियकराने विवाहितेच्या घरात घुसून तिच्या दिशेने गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केला. मात्र, विवाहिता स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर प्रियकराने घराबाहेर जाऊन स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. काल (दि. 25) सकाळी साडेनऊ वाजता विळद परिसरात ही घटना घडली. 

अमृतलाल दुखिराम पाल (वय 42, रा. फत्तेपूर, जि. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) हे मयत व्यक्तिचे नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला झालेल्या झटापटीत सदर विवाहिता किरकोळ जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पाल याचे विळद परिसरात राहणार्‍या एका महिलेवर अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम होते. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तो उत्तरप्रदेश येथून निघाला होता. शनिवारी सकाळी नगरला पोहोचला. विळद येथे आल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तो सदर महिलेच्या घरात घुसला. महिलेचा पती व मुले बाहेर गेली होती. ती घरी एकटीच होती. 

पाल हा घरात घुसल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. भांडणात त्यांच्यात झटापट सुरू झाली. पाल याने सदर महिलेस खाली पाडले व तिच्यावर पिस्तूल रोखले. तिने विरोध करून पाल याच्यापासून सुटका करून घेतली. त्याने तिच्या दिशेने गोळी झाडली. परंतु, सुदैवाने तिने स्वतःचा बचाव करून घेतला. दोघांच्या आरडाओरडीमुळे शेजारी राहणारी एक युवती व महिला मदतीसाठी धावल्या. त्यानंतर पाल हा सदर महिलेच्या घराबाहेर पळाला व त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेतली. छातीत गोळी लागल्याने पाल याचा जागीच मृत्यू झाला. 

विळद ग्रामस्थांनी घटनेची माहिती तात्काळ एमआयडीसी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मयत पाल याच्या मृतदेहाजवळ गावठी कट्टा सापडला. तो हस्तगत करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, झटापटीत पोटाला दुखापत झाल्याने सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

उत्तरप्रदेशातूनच आणला गावठी कट्टा

मयत अमृतलाल पाल हा उत्तरप्रदेशातच राहत होता. शनिवारी सकाळी तो नगरमध्ये दाखल झाला. एकतर्फी प्रेमाला सदर विवाहिता भीक घालत नसल्याने तो शेवटच्या भेटीसाठी आला होता. महिलेने त्याच्या प्रेमाला विरोध करताच सोबत आणलेला गावठी कट्टा बाहेर काढून तिच्यावर रोखला, अशी माहिती सूत्रांकडून समजली.