Sun, Jul 21, 2019 02:19होमपेज › Ahamadnagar › ‘एमजीपी’साठी पुन्हा बैठकीचा फार्स!

‘एमजीपी’साठी पुन्हा बैठकीचा फार्स!

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:16AMनगर : प्रतिनिधी

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकारी व पदाधिकार्‍यांसोबत यापूर्वी घेतलेल्या बैठकीतून जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेले नसतांना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील अपूर्ण पाणीयोजना व वीजबिलांसाठी पुन्हा एकदा बैठकीचा फार्स घालण्यात आला आहे. टंचाई आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी अपूर्ण योजनांचे ‘तुणतुणे’ वाजविल्यानंतर पालकमंत्र्यांनीही बैठकीचे आश्वासन देत सर्वांची ‘बोळवण’ केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात टंचाई आढावा व नियोजन बैठक पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, खा. दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आ. विजय औटी, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने,  जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले आदींची उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीसच पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांनी कान्हूर पठार पाणीयोजनेच्या वीजबिलाचा विषय काढला. त्यांच्यानंतर आ. बाळासाहेब मुरकुटे, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर यांनीही पाणीयोजनांची कैफियत मांडली. खा. दिलीप गांधी यांनीही भिंगारच्या नागरिकांना व्यावसायिक दराने पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले.
शिंदे म्हणाले की, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टंचाई उपाययोजनांचा आराखडा बनवला आहे. आराखड्यानुसार प्रस्तावित कामे तात्काळ मार्गी लावावीत. टँकरचे प्रस्ताव आल्यावर ते तपासून तात्काळ कार्यवाही करावी. सध्या पारनेर, संगमनेर तसेच काही प्रमाणात शेवगाव, पाथर्डी भागात पाणीटंचाईच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणच्या नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याने, नादुरुस्त असल्यानेही त्या-त्या गावांत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

संगमनेर तालुक्यात टँकरच्या प्रस्ताव मंजुरीसाठी प्रांताधिकार्‍यांनी पाहणी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा दुसर्‍या प्रांताधिकार्‍यांकडून तपासणीचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? असा सवाल कृषी सभापती अजय फटांगरे यांनी केला. तसेच ट्रान्सफॉर्मर जळाल्यास महावितरणचे अधिकारी शेतकर्‍यांकडून पैसे घेऊनही ट्रान्सफॉर्मर बदलून देत नसल्याची तक्रार केली. त्यावर पालकमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिले.