Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Ahamadnagar › ती प्रेमळ छडी! अर्थात मला घडवणारे शिक्षक! : शशी त्रिभुवन

ती प्रेमळ छडी! अर्थात मला घडवणारे शिक्षक! : शशी त्रिभुवन

Published On: Sep 05 2018 10:06AM | Last Updated: Sep 05 2018 10:06AMकानाला उजवा हात टेकवून हेडगुरुजींनी मी सहा वर्षांचा झाल्याची खात्री करून घेतली आणि मला पहिलीत दाखल करून घेतले. गुरूजी खूप मारतात असं मोठ्या चुलत भावाने सांगितलेले आणि सख्ख्या भावाचा दाखला पाचवीसाठी हायस्कुलमध्ये गेलेला, त्यामुळं मला सोबत याच भावाची. दोन-चार दिवस त्याच्या वर्गात त्याच्यासोबत बसलो पण आक्काचं ऐकून हेडगुरुजींनी पोरगं घाबरतयं म्हणून बाईंच्या वर्गात माझं नाव घ्यायला लावलं. शाळा तशी मोठीच; चौथीपर्यंत असली तरी एकेका वर्गांच्या तीन-तीन तुकड्या होत्या. वाड्यावस्त्यांवर शाळा नव्हत्या जास्त म्हणून सगळेच मुलं गावातल्या मोठ्या शाळेत भर्ती होत असत.

पहिली सहामाही अबोलपणातच गेली. दोस्तमंडळी झाली नाही, तसाही मूळचा मी अबोल किंवा घुम्या! पण बाईंनी सांगितलेलं, शिकवलेलं पाटीवर अचूक गिरवलेलं असायचं. लिखाणाच्या पद्धती, डावी-उजवी दिशा, पाटी कशी धरावी? बोटात पेन्सिल कशी पकडायची असे बारकावे बारकाईने लक्षात घेत होतो. हेडगुरुजींची वऱ्हांड्यातून वेताची छडी घेऊन नित्यनेमाने फेरी असायची-कुठल्या वर्गात काय चाललंय याचा कानोसा आणि अंदाज घेत ते फिरत असायचे. त्यांच्या धाकाने आणि करड्या शिस्तीने सगळीच मुले वर्गात शांत असायची शिवाय आजच्या सारखी मास्टरमंडळी ऑनलाईन नसल्याने मासिक अहवालाशिवाय एकही कागद नसायचा तो हेडगुरुजी तयार करून पाठवायचे.

तर सांगत होतो की त्यांची वेताची छडी अशी नजरेत आणि मनात भीती बसलेली. असंतसं दुसरीत मजेत गेलेलो- निकाल सांगण्याची गम्मत असायची- अमुक, तमुक, धमुक अशी तीन-चार नावं वाचायची आणि तेवढे नापास, उरलेले सगळे पास! पण पहिल्याच वर्षी पहिलीत माझंही नाव निकालाच्या वेळी घेतलेलं ते वर्गात पहिला आलो म्हणून! आनंद-बिनंद झाला पण सांगावं कोणाला? घरी आई सारवून घेत होती, तिला आल्यावर तोंडी निकाल सांगितला ती म्हटली असाच आता पहिला नंबर सोडू नकोस! म्हणजे मी हुशार होतो तर...

पण दुसरीत आलो, आमच्या बाई रजेवर असतील असं हेडगुरुजी म्हणाले आणि तीन-चार महिने आमची हेळसांड सुरू झाली. दुसऱ्या तुकडीत बसायचो पण दाटीवाटीने बसावं लागे. त्यातच थोड्या-फार दोस्त मंडळींसोबत खोड्या सुरू झालेल्या... असाच मधल्या सुट्टीत सगळे मुलं मैदानावर खेळत असताना बांधकामासाठी आणलेल्या वाळूतून पत्र्यावर दगड मारण्याचा सामूहिक खेळ सुरू झाला, सगळे मस्त दगड फेकत होते, पण कुठूनतरी हेडगुरुजींचं लक्ष नेमकं माझ्यावर गेलं, पकडलं आणि त्यांच्या हातातील वेताची छडी हातावर-बोटांवर सपासप बसू लागली. रडलो-बोंबललो पण चूक केली म्हणून भयंकर शिक्षा मिळाली. बाकीची चाप्टर पोरं गुपचूप पसार झालेली! तर असा छडीचा पहिला प्रसाद!

बोरांचा सिझन सुरू झालेला; घरी बोरी भरपूर, शिवाय प्रत्येकीची बोरांची चव वेगळी- खारकी, आंबट, गोडी, बुटूरणी अशी वेगवेगळी नावं आजीनं  दिलेली. तर त्या बोरींची बोरं मी दप्तरातून शाळेत न्यायचो, गुपचूप पोरांना द्यायचो,  मी धाकामुळेमधल्या सुट्टीत बोरं खायचो. काही बहाद्दर पोरं बोरं खाऊन गिठूळ्या खिशात ठेवायचे, नंतर टाकून देण्यासाठी; पण तरीही बोरांचा वास दप्तरातून दरवळत रहायचाच! एके दिवशी असाच वर्गात बऱ्याच मुलांचा हा उद्योग सुरू असताना मीही एक बोर तोंडात टाकलं, त्याची गिठुळी बाहेर फेकली, पण हाय रे दुर्दैव; नेमके त्याच वेळी आमचे हेडगुरुजी पडवीतून राऊंड मारीत होते, ती गिठुळी नेमकी जाऊन त्यांच्या धोतराच्या सोग्यात अडकली! चोर तर रंगेहाथ पकडला होताच, पण चोराने गुरुजींची पंचाईत केली होती, त्यांनी ऑफिसमध्ये नेऊन मला अक्षरशः मरेस्तोवर मारलं! हातातील वेताची छडी मोडली, पाठीवर हातावर निळे-काळे वळ उमटले! डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. दुपारी अकराच्या सुट्टीत घरी गेलो आणि घरीच थांबलो. आक्काला पोट दुखतंय असं खोटं सांगितले तीही शेत-जनावरांच्या कामाच्या गडबडीत होती, म्हणून जास्त चौकशी केली नाही. पण खरं सांगून अधिक मार खाण्याची हिम्मत मी करू शकलो नाही. छडी माझा पिच्छा पुरवीत होतीच..!

आता या सगळ्या प्रसंगांवरून कुणी हल्लीच्या परिस्थितीप्रमाणे विचार करून त्या आमच्या गुरुजींनी गहन अपराध केला असे म्हणू लागेल तर त्यांना मी सांगेल की नाही, त्यांच्या शिस्तीच्या धोरणात ते बरोब्बर होते, पण पारख होत नव्हती, किंवा एवढ्या चार-पाचशे मुलांमध्ये माझी अभ्यासातील हुशारी लक्षात आलेली नसावी. ती सिद्धता मी चौथी उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना समजली, कारण की मी चौथीत पूर्ण केंद्रातून ऐंशी टक्के मिळवून पहिला आलो होतो आणि केंद्रातील दुसऱ्या एका शिक्षकांची मुलगी सगळे प्रयत्न करूनही दुसरी आली होती, अर्थातच हे सगळे व्यवस्थितपणे घडले होते ते आमच्या ''त्या"च हेडगुरुजींमुळे! त्यांच्या शिस्तीने आणि काटेकोर नियंत्रणामुळे. मला हे कसे कळले तेही सांगावेच लागेल त्याशिवाय ती छडी प्रेमळ होती हे कळणार नाही मित्रांनो! 
चौथीतून पाचवीच्या वर्गात हायस्कूलमध्ये गेलो, तो वर्गही मराठी शाळेच्या एका इमारतीत उसना भरायचा, तिथे हेडगुरुजींचे ऑफिस होते. हायस्कुलमध्ये शिपाईमामांनी निरोप दिलेला की मागच्या वर्षी चौथीत जो मुलगा पहिला आला त्यानं गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निकालपत्रक जमा करावं. मला तर निकालपत्रक नव्हतेच आणि त्याकाळी ते मिळतही नव्हतेच. पण कुणीतरी सांगितले की मराठी शाळेतल्या मुख्याध्यापकांना भेट आणि विचारून बघ- म्हणून गेलो भीत-भीत, ते खुर्चीवर बसलेले होते, मला बघितले उठले आणि जवळ घेऊन पाठीवरून प्रेमाने हात फिरवत बोलले- "अरे ये ना जवळ, घाबरू नकोस, मला माहिती आहे मी खूप मारलं तुला तीन-चार वेळेस, पण तू आपल्या शाळेचं नाव काढलंस. तू खूप हुशार आहेस, त्या गुरुजींच्या मुलीला मागे टाकून पहिला आलास केंद्रात, मी तुझे पेपर पाहिलेत, छान लिहिलेले होते...."

मला गहिवरून आलं, ज्या गुरुजींनी छडीनं मारलं त्यांचाच प्रेमळ हात पाठीवर फिरत होता, मी हळूच सांगितले, 'गुरुजी, मला निकालपत्रक मागितलंय हायस्कूलमध्ये, स्कॉलरशिपसाठी'.
ते उठले कपाटातून मोठ्या कागदावर लिहिलेलं एकत्रित निकलपत्रक काढलं आपल्या वळणदार अक्षरात साध्या कागदावर माझं नाव, परीक्षा नंबर, वर्ष आणि विषयवार मार्क असं सगळं लिहून माझ्या हातात दिलं, आणि खूप मोठा हो असा तोंडभरून आशीर्वाद दिला, तो लाखमोलाचा कागद आणि तो आशीर्वाद मी मनात काळजात कायमसाठी जपून ठेवलेला आहे! माणूस म्हणून मोठ्ठा होण्यासाठी!! माझ्या गुरुजींच्या त्या वेताच्या छडीनं मला शिकवलं आणि घडवलंसुद्धा! खरंच ती छडी प्रेमळ होती!!

- शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)
8275032897