होमपेज › Ahamadnagar › मनपाला अधिकारी देता का हो..!

मनपाला अधिकारी देता का हो..!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांची नांदेड येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर काल (दि.27) बदली करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी बदलीचे आदेश दिले असून, त्यांना तात्काळ नगरमधून कार्यमुक्तही करण्यात आले आहे. दरम्यान, मनपातील दोन्ही उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता आदी प्रमुख अधिकार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने उद्भवलेल्या प्रशासकीय आणीबाणीचा अहवाल आयुक्त घनश्याम मंगळे यांनी शासनाला सादर केला आहे. रिक्त पदांवर तात्काळ अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जुलै 2017 मध्ये उपायुक्त अजय चारठाणकर व भालचंद्र बेहेरे यांच्या बदल्या झाल्यानंतर शासनाने बेहेरे यांच्या जागेवर चव्हाण यांची नियुक्ती केली होती. नियुक्तीनंतर त्यांनी वसुलीच्या कामावर लक्ष केंद्रीत करुन जप्ती मोहिम सुरु केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना ही मोहीम थांबवावी लागली. मनपात पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यातील काही देयकांच्या प्रस्तावांवर उपायुक्त चव्हाण यांच्या सह्या असल्यामुळे तेही पोलिस चौकशीच्या फेर्‍यात अडकले. 

मुख्यलेखाधिकार्‍यांसह प्रभारी उपायुक्तांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर वैद्यकीय कारण पुढे करत ते 4 एप्रिलपर्यंत रजेवर गेले होते. या दरम्यानच काल त्यांची नांदेड येथे बदली झाल्याचा आदेश महापालिकेत प्राप्त झाला. चव्हाण यांची महापालिकेतून सुटका झाली असली तरी पथदिवे घोटाळ्याच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे कायम आहे. आज (दि.28) त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे मनपातील प्रमुख अधिकार्‍यांची पदे रिक्त झाल्यामुळे आयुक्त मंगळे यांनी उशिराने का होईना शासनाला परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे. उपायुक्त (सामान्य) या पदावर गेल्या 8 महिन्यांपासून नियुक्ती झालेली नाही. आता चव्हाण यांचीही बदली झाली आहे. सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांचा प्रभारी कार्यभार असलेल्या विक्रम दराडे यांचे निलंबन झाले आहे. तर मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांना अटक झाल्यानंतर ते 48 तास कोठडीत होते. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचे आदेश कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता कायम आहे. शहर अभियंता पदही अनेक महिन्यांपासून रिक्तच आहे. अशा परिस्थितीत मनपाची प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यातच आगामी काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु होणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या रिक्त जागांवर तात्काळ अधिकारी मिळावेत, अशी मागणी आयुक्तांनी पत्राद्वारे नगरविकास विभागाकडे केली आहे.


  •