Sun, Jul 21, 2019 01:38होमपेज › Ahamadnagar › करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर

करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:52PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

कोणतीही करवाढ नसलेला शिलकीसह 133 कोटी 27 लाख 11 हजार रुपयांचा अर्थसंकल्प काल पालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. 

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या उपस्थितीत हा 71 वा अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला. 133 कोटी 22 लाख 11 हजार रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. त्यात महिला व बालकल्याण 40 लाख, हिवताप निर्मूलन 15 लाख, अपंगांसाठी 30 लाख, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी 1 कोटी 25 लाख, रस्ते बांधकाम 1 कोटी 50 लाख, दलित वस्ती सुधारणा 1 कोटी, शहरात सीसीटीव्ही बसविणे 30 लाख, पाणी साठवण तलाव 11 कोटी, अंडर ग्राऊंड योजना 10 कोटी 80 लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 1 कोटी 11 लाख, नेहरू मार्केट नूतनीकरण 2 कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व दुरुस्ती 1 कोटी, मिल्लतनगर ते वैदूवाडीकडे जाणारा रस्ता 50 लाख, घरकुल दुरुस्ती 2 कोटी 50 लाख, प्रियदर्शनी मंगल कार्यालय 50 लाख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह नूतनीकरण 50 लाख, पाणी मीटर बसविणे 10 लाख, मोबाईल टॉयलेट व्हॅन 10 लाख, सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा 2 कोटी, नगरपरिषद वर्धापनदिन 1 लाख, तसेच इतर सुविधांसाठी 133 कोटी 23 लाख 91 हजार रुपये खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 

यापूर्वी रामरहिम उत्सव, शिवजयंती, गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या उत्सवांना नगरपालिकेच्यावतीने देणगी देण्यात येत होती. परंतु यंदा या देणग्या बंद करण्यात आल्या असल्यााचे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले. परंतु अर्थसंकल्पात आंबेडकर जयंतीसाठी 1 लाख 50 हजारांची तरतूद केल्याचे दिसत आहे. 

चालू वर्षापासून पालिकेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी 1 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या दिवशी साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, कला, क्रीडा, स्वच्छता किंवा इतर क्षेत्रात नैपुण्य दाखविणार्‍या व्यक्ती व संस्था यांना ‘श्रीरामपूर भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शहरात आणखी दोन ठिकाणी भाजी मंडई उभारण्यात येणार असल्याचे आदिक यांनी सांगितले.