Sat, Mar 23, 2019 02:12होमपेज › Ahamadnagar › ‘उपमहापौर’साठी भाजपचा उमेदवार नाही?

‘उपमहापौर’साठी भाजपचा उमेदवार नाही?

Published On: Feb 26 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 11:30PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे श्रीपाद छिंदमने उपमहापौर पद गमावले. या पदासाठी 5 मार्चला निवडणूक जाहीर झाल्यामुळे आगरकर गटाकडून उमेदवारीसाठी हालचालीही सुरु झाल्या आहेत. मात्र, छिंदम प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या गांधी गटाकडून उपमहापौर निवडणुकीत उमेदवारच द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली जात आहे. शुक्रवारी (दि.23) सायंकाळी झालेल्या भाजपच्या बैठकीत याबाबत सूतोवाच करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत प्रदेशाध्यक्षांशी चर्चेनंतरच निर्णय होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

छिंदमच्या वक्‍तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. पक्षानेही दखल घेत त्याची पक्षातून हकालपट्टी केली, उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला असला, तरी या प्रकरणामुळे शहर भाजपातील गांधी गट चांगलाच बॅकफूटवर गेला असून पक्षालाही बदनामीला सामोरे जावे लागले. विरोधी आगरकर गटानेही या प्रकरणानंतर खा. दिलीप गांधी यांना टार्गेट केले. छिंदम प्रकरणापाठोपाठ खा. गांधी यांच्या बंगल्याचे अतिक्रमण व हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याची मनपाकडून झालेली मोजणी आणि आता अपहरण व खंडणीप्रकरणी खा. गांधी व नगरसेवक सुवेंद्र गांधींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेला गुन्हा या गेल्या 10 दिवसांतील या तीन प्रकरणांमुळे गांधी गट चांगलाच हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

छिंदमच्या वक्‍तव्याचे पडसाद, बंगल्यांचे अतिक्रण आणि गांधी पिता-पुत्रांवर खंडणी, अपहरणाचे दाखल झालेले गुन्हे यामुळे शहर भाजपलाही मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षांनी या सर्व प्रकरणात खुलासा करण्याची सूचनाही बैठकीत झाली. 

छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत सोमवारच्या सभेत घ्यावयाच्या भूमिकेवर चर्चा झाल्यानंतर 5 मार्चला होणार्‍या उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यात उपमहापौर निवडणुकीत भाजपाने उमेदवारच द्यायचा नाही, अशी सूचना एका नेत्याने मांडली. मात्र, याबाबत आत्ताच भूमिका न घेता प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुनच निर्णय घ्यावा, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे आगरकर गटाकडून मात्र उपमहापौर निवडणुकीसाठी दत्तात्रय कावरे यांना संधी मिळण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, कावरे हे स्वतः इच्छुक नसून त्यांनी सावेडी उपनगराला उपमहापौर द्यावे, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांनी उषा नलवडे यांचे नाव पुढे केल्याचे सांगितले जात आहे. तर नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांचेही नाव या पदासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले असून त्यांनी प्रयत्न सुरु केल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत गांधी गटाकडून उपमहापौर निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही, असा निर्णय घेतला गेल्यास पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.