होमपेज › Ahamadnagar › नितीन आगे खून प्रकरणातील १३ फितूरांना नोटीस 

नितीन आगे खून प्रकरणातील १३ फितूरांना नोटीस 

Published On: Dec 11 2017 8:06PM | Last Updated: Dec 11 2017 8:05PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नितीन आगे खून प्रकरणात फितूर झालेल्या साक्षीदारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  न्यायालयाने १३ फितूर साक्षीदारांना नोटीस काढण्याचा आदेश देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.

आगे हत्याकांडातील फितूर साक्षीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी खटल्याचे कामकाज पाहणारे सरकारी वकील ॲड. रामदास गवळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या खटल्यात फितूर झालेल्या सदाशिव आश्रूबा होडशीळ (रा. गितेवाडी, ता. जामखेड), विकास कचरू डाडर, रमेश भगवान काळे, रावसाहेब ऊर्फ बबलू अण्णा सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, बबलू ज्ञानेश्‍वर जोरे, विष्णू गोरख जोरे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड), सदाशिव मुरलीधर डाडर (रा. चुंभळे, ता. जामखेड), साधना मारुतीराव फडतरे, राजेंद्र बाजीराव गिते (दोघे रा. जामखेड), अशोक विठ्ठल नन्नवरे, हनुमंत परमेश्‍वर मिसाळ (दोघे रा. खर्डा, ता. जामखेड), राजू सुदाम जाधव (रा. करंजवल, ता. पाटोदा, जि. बीड) यांना नोटीस काढण्याचा आदेश सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिला आहे. 

नितीन आगे युवकाला प्रेमसंबंधाच्या संशयावरून शाळेतून ओढत गावातून मारहाण करीत धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर डोंगरावरील झाडाला गळफास देऊन खून करण्यात आला होता. २०१४ रोजी घडलेल्या या खटल्यातील २६ पैकी तब्बल १३ साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी २३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सुटका केली होती. या संवेदनशील प्रकरणाच्या  निकालाननंतर समाजात उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सरकारी पक्षाने फितूर साक्षीदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. 

तसेच या खटल्याचे गुरुवारी दि. ७ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उच्च न्यायालयात या खटल्याचे कामकाज पाहण्याकरिता चांगल्या विधीतज्ज्ञांची नियुक्ती करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच या खटल्यात बेस्ट बेकरी हत्याकांडाप्रमाणे फेरसुनावणीचीही मागणी होऊ लागलेली आहे.