Tue, Mar 19, 2019 11:58होमपेज › Ahamadnagar › देश स्वयंपूर्ण करणार्‍यांच्या नशिबी फाशी

देश स्वयंपूर्ण करणार्‍यांच्या नशिबी फाशी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:32AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार्‍या शेतकर्‍यांच्या नशिबी फाशी असल्याने शेतकरी उध्द्वस्त होत चालला आहे. यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येणे गरजेचे असून दि. 14 मे रोजी राज्यभर होणार्‍या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातून 10 हजार शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सुकाणू समितीचे मार्गदर्शक रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीच्यावतीने काल सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील हुतात्मा रामचंद्र धंदेवार यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर श्रीरामपूर मार्केट कमिटीच्या शेतकरी सभागृहात भव्य शेतकरी जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

यावेळी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, किशोर ढमाले, बाळासाहेब पटारे, शिवाजी जवरे, डॉ. अजित नवले, अ‍ॅड. बन्सी सातपुते, नामदेव गावडे, सुशिलाताई भोसले, औताडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब पटारे यांनी करून शेतकरी जागर यात्रेची पार्श्‍वभूमी विषद केली.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, ऊस तोडणी झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत उसाचे पेमेंट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणे कारखान्याला बंधनकारक असते. मात्र, दोन दोन महिने होऊनही शेतकर्‍यांना उसाची रक्कम मिळालेली नाही. दुधालाही 17 ते 18 रुपये भाव मिळत आहे. राज्यभरात 3 कोटी लिटर दुधाचे संकलन होत असताना शेतकर्‍याची लिटरमागे 6 ते 7 रुपयांनी लूट असल्याने दुधातून शेतकर्‍याला 21 कोटी रुपयांचा तोटा दररोज सहन करावा लागत आहे. सरकारचे धोरण पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकरी अडचणीत आला असून निर्यातबंदी, हमीभाव, फसवी कर्जमाफी यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. 

कालिदास आपेट म्हणाले, महाराष्ट्रातील 23 जिल्हे व कर्नाटकातील 1 जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत या शेतकरी जागार यात्रेच्या माध्यमातून जनजागृती चालू आहे. गुजरातमध्ये उसाला 4 हजार 441 रुपये भाव मिळत असताना महाराष्ट्रात मात्र 2200 ते 2300 रूपये भाव देऊन शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. कर्जमाफी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबांनाही मदत देण्यात सरकार विलंब करत आहे. उद्योगपतींच्या पाठीशी असलेल्या सरकारकडून शेतकर्‍याची लूट सुरू असल्याने याबाबत जनजागृतीसाठीच या शेतकरी जागृती सभेचे आयोजन करण्यात आल्याचे आपेट यांनी सांगितले. राजेंद्र बावके, अजय महाराज भारस्कर, नामदेव गावडे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अहमदभाई जहागिरदार यांनी मानले.  यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जेलभरो आंदोलनासाठी भरण्यात येणार्‍या फॉर्मचे वाटप करण्यात आले.