होमपेज › Ahamadnagar › शिर्डीत एका तासात ६००० भाविकांच्या दर्शनाचे नियोजन

लवकरच एका तासात ६००० भक्तांना साईदर्शन

Published On: Dec 11 2017 8:00PM | Last Updated: Dec 12 2017 10:00AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

शिर्डीतील साईबाबांच्या समाधीस्थळाचे आता एक तासात सहा हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठीचे शिर्डी सस्‍थानकडून नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण वर्षात अडीच कोटी भाविक येथे दर्शनाला येतात. त्यांच्यामार्फत चारशे कोटींची देणगी प्राप्त होते. अशी माहिती, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी येथे दिली. 

साईबाबांच्या दर्शनासाठी आता कुठलीही आडकाठी राहिली नाही. दलालांपासून मुक्त प्रवेशद्वार केले असून, आता भाविकांचा दर्शन कालावधी हा 25 ते 55 मिनिटे इतका करण्यात आला आहे. एका तासात सुमारे सहा हजार भाविक दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रतिमाणसी 200 रुपये सशुल्क अशा प्रकारे दर्शन व्यवस्थेत मोठा बदल केल्याने 18 कोटींच्या वार्षिक उत्पन्नात 25 कोटींची वाढ झाली असून, ते आता 43 कोटी झाले आहे. ही वाढ केवळ दलालमुक्तीमुळे झाली असून, इतका पैसा भाविक दलालांना देत होते, असे आता समोर आले आहे. आता सशुल्क पाससाठी कुणाच्याही पत्राची गरज पडणार नसल्याचे सुरेश हावरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष हे सन 2017 च्या दसर्‍यापासून ते सन 2018 च्या दसर्‍यापर्यंत राबविण्यात येत आहे. संपूर्ण भारतात आठ हजार, तर विदेशात साडेचारशे साईबाबांची मंदिरे आहेत. या माध्यमातून येत्या 23 डिसेंबर रोजी साई मंदिर विश्‍वस्तांची एक परिषद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत होत आहे. या शताब्दी वर्षात पंचसूत्रीद्वारे जनसेवा करण्यात येणार आहे. यात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदान, नेत्रदान, आरोग्य चिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी येथे रक्तदान करणार्‍या भाविकाला दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आले असून, रोज 70 ते 80 भाविक रक्तदान करतात. ते महाराष्ट्रातील विविध रक्तपेढ्यांना देण्यात येते. यामध्ये रक्तदात्‍यांची वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाधी शताब्दी वर्षानिमित्त 30 डिसेंबर रोजी शिर्डी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. जिथे साई मंदिर आहे तिथे स्थानिकांनी त्याचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.